
परभणीमध्ये पाच जणींनी उभारलेल्या उद्योगाची भरारी
परभणी : परभणीतील पाच महिलांनी एकत्र येऊन शेतीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाइपचा कारखाना सुरू केला आहे आणि त्यात त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. कारखान्यातून निर्मिती होणाऱ्या ‘सुविधा पाइप्स’ मराठवाड्याचे ब्रॅंडनेम ठरत आहे.परभणीत उद्योग नाहीत अशी ओरड सातत्याने होते आणि त्यात तथ्यही आहे. परंतु जिद्द, मेहनत, चिकाटीने अनेक संकल्पना वास्तवात उतरविणारीही अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यात या पाच महिलांचा समावेश आहे. त्यांनी एकत्र येऊन उभारलेला पाइप कारखाना लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या कारखान्यातून तयार होणारे पाइप मराठवाड्यासह विदर्भ, तेलंगणा राज्यातही पाठविले जातात. उत्कृष्ट दर्जा राखल्याने पाइपला मोठी मागणी आहे.
हेही वाचा: ग्रामीण भागात शौचालयांचा वापर बैलांचा चारा, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी; कधी थांबणार लोटा परेड?
परभणी येथील कांताबाई एकनाथराव खटिंग, माधुरी चंद्रशेखर आहेर, कोमल राहुल दराडे, जयश्री कल्याण पाटील व कविता उत्तमराव सरदे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या अर्थसहाय्यातून परभणीच्या औद्योगिक परिसरात हा कारखाना उभारला. २७ जानेवारी २०१५ ला तत्कालीन सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते कारखान्याचे उद्घाटन झाले. सहा वर्षांत या उद्योगाने भरारी घेतली आहे. या कारखान्याच्या माध्यमातून वर्षाकाठी तीन ते साडेतीन कोटींच्या घरात उलाढाल होते. कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल गुजरात, मुंबई आणि जयपूर (राजस्थान) येथून आणला जातो. सध्या कारखाना २४ तास सुरू राहत असून तीन शिफ्टमध्ये कामगार येतात. सध्या या कारखान्यात १८ कामगारांना रोजगार मिळाला आहे. कारखान्याला सप्टेंबर २०१५ मध्ये आयएसआय तर जून २०१५ मध्ये आयएसओ मानांकन मिळाले आहे. यावरूनच कारखान्यातील उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध होते.
जबाबदारीही घेतली वाटून
पाच महिला केवळ मालक म्हणून कारखान्यात वावरत नाहीत. पाच पैकी चार महिला उच्चशिक्षित असल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामाची विभागणी करून घेतली आहे. उत्पादनापासून व पुरवठ्याचे काम कांताबाई खटिंग पाहतात. माधुरी आहेर व जयश्री पाटील या मार्केटिंगचे काम पाहतात. जाहिरातीचे काम कोमल दराडे पाहतात. आर्थिक देवाण - घेवाण व बँकेची कामे कविता सरदे पाहतात.
हेही वाचा: नांदेड ग्रामीण भागात अद्यापही लोटा परेड सुरूच
उद्योग मंत्रालयाकडून सन्मान
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिला जाणारा यशस्वी उद्योजक म्हणून ‘सुविधा पाइप्स’च्या संचालकांचा २०१८ मध्ये मुंबईत तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान झाला होता. या पुरस्कारामुळे कार्याला आणखी प्रेरणा मिळाल्याचे या महिलांनी सांगितले. गुणवत्तापूर्वक उत्पादन केले जात असल्याने अल्पावधीत पाइपला चांगली मागणी आहे. लवकर एसडब्ल्यूआर पाइपचेही उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: रायगड जिल्ह्यातील पक्षी निरीक्षण क्षेत्रं बहरली
कारखान्याची वाटचाल
मराठवाडा, विदर्भासह तेलंगणातही पुरवठा
वार्षिक तीन कोटींची उलाढाल
आयएसआय, आयएसओ मानांकन
अठरा कामगारांतर्फे २४ तास पाइप निर्मिती
Web Title: The Boom Of An Industry Set Up By Five People In Parbhani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..