वेळा अमावास्येला चोरट्यांनी साधली वेळ : लातूर-उस्मानाबादेत चोऱ्याच चोऱ्या

Aurangabad news
Aurangabad news

लातूर/उस्मानाबाद : वेळा अमावास्येला चोरट्यांनी लातूरात एक, औसा तालूक्यात तब्बल आठ, तर चाकूरमध्ये एक घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे. उस्मानाबादेतही उमरगा तालुक्यात पाच चोऱ्या झाल्या. घरफोडीच्या या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

मराठवाड्यात बहुतांश भागात वेळा अमावास्या हा सण साजरा केला जातो. लातूर-उस्मानाबादेतही हा सण मोठ्या उत्साहात बुधवारी (ता. २५) साजरा करण्यात आला. मात्र, शहरात पसरेल्या शुकशुकाटामुळे चोरट्यांनी शहरात आणि जिल्ह्यात १० ठिकाणी घरफोडी केल्याचे गुरूवारी (ता. २६) समोर आले. लातूरमधील वैभव नगरमध्ये राहणारे जयराम चंदू राठोड (वय ३३) हे आपल्या घराला कुलूप लावून होलदूर (ता. आळंद) या मुळगावी वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी गेले होते.

चोरट्यांनी मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे एक तोळ्याचे आणि अकरा ग्रॅमचे झूमके, रोख ४० हजार रूपये असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज बॅगेत भरून तिथून पळ काढला. गावाहून परत आल्यानंतर राठोड यांना हा प्रकार समजला. त्यांनर त्यांनी गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

औसा येथील श्रीनिवास नगर भागात एकाच ठिकाणी तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. येथे राहणारे प्रल्हाद शेषेराव इंगळे (वय ४८) हे वेळा अमावास्येसाठी शेताकडे गेले होते. त्यांच्या घरात शिरून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, झुमके, सरपाळे, आंगठी या दागिन्यांसह रोख ३४ हजार रुपये पळवून नेले.

त्यांच्या शेजारी राहत असलेल्या मच्छींद्र बळीराम कदम यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ ग्रॅम वजनाच्या ६ सोन्याच्या आंगठ्या, असा ५० हजार रुपयांचा ऐवज आणि दत्ता लहू मुदगळ यांच्या घरातून मिनी गंठण, दोन आंगठ्या असा ५० हजार रुपयांचा ऐवज पळवला. या तीनही घटनेत चोरट्यांनी २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. या प्रकरणी इंगळे यांनी औसा पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी (ता. २५) तक्रार दाखल केली.

अशीच घटना चाकूरमध्येही घडली आहे. विश्वनाथ सोपान गायकवाड (वय ५५, रा. नागेशवाडी) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याची चैन, झुमके, चांदीची चैन, जोडवे आणि रोख पाच हजार रुपये असा ४७ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. ही घटना बुधवारी (ता. २५) दुपारी घडली. या प्रकरणी गायकवाड यांनी चाकूर पोलिस स्टेशनमध्ये लगेचच तक्रार दाखल केली.

चोरट्यांनी औशात फोडली आठ घरे 

औसा : शहरातील आठ घरफोड्यांत सहा तोळे सोन्यासह पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला गेला. भरदिवसा घडलेल्या या घरफोड्याने औसा शहर हादरले आहे. घरातील मंडळी शेतातून परतल्यावर त्यांना चोरीचा प्रकार दिसून आला.

बुधवारी (ता.25) वेळा अमावास्याच्या दिवशी येथील अन्नपूर्णा आणि रामकृष्णनगर येथे अज्ञात चोरट्यांनी आठ घरे फोडून यातील काही घरातून सहा तोळे सोने आणि अंदाजे 45 हजारांचा ऐवज लंपास केला. अन्नपूर्णानगरमधील नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी महादेव मनगुळे यांच्या घरातील मेनगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

मात्र या घरात चोरांच्या हाती काहीच लागले नाही. त्याच घरात किरायाने राहत असलेले शिवहार मुळे यांच्याही घराचे कुलूप तोडून या घरातून काही रक्कम हाती लागल्यावर वरच्या मजल्यावर असलेल्या दगडू पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केले; पण हाती काहीच लागले नाही.

याच गल्लीच्या बाजूस असलेल्या रामकृष्णनगर येथे प्रहाल्द शेषेराव इंगळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील साडेतीन तोळे सोने तसेच 35 हजार नगदी काढून घेतले त्यांच्याच घरासमोर असलेले शिक्षक गोविंद चोधरी यांच्या घराचे कुलूप तोडले; मात्र येथे काहीच मिळाले नाही. याच घरात भाड्याने राहत असलेले मच्छिंद्र कदम यांचाही दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला; मात्र या घरात चोरांना काही सापडले नाही.

शेजारी असलेल्या दत्तात्रय मुदगल यांच्या गच्चीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले दीड तोळे सोने व चार हजार नगदी लंपास केले. याच ठिकाणी राहत असलेले कल्याण खोजे यांच्याही घरात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम चोरली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातही पळविला नऊ लाखांचा ऐवज 

उमरगा तालुक्‍यातील व्हंताळ येथे बुधवारी (ता. 25) दिवसाच चोरट्यांनी पाच घरे फोडून जवळपास 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह साधारणतः नऊ लाखांचा ऐवज लुटला. दरम्यान, वेळा अमावास्यानिमित्त शेतकरी कुटुंब पूजेसाठी शेताला गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून अवघ्या दीड तासात घरफोडी करून पसार झाले.

प्रताप शिवाजी मोहिते (महाराज) यांच्या घराचे कुलूप टॉमीने तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सुमारे 24 तोळे सोन्याचे दागिने, तसेच शेतमालाच्या विक्रीतून आलेले सत्तर हजार रुपये लंपास केले. प्रताप मोहिते यांची मुलगी आरती गावातच राहते. संदीपान पाटील यांची सून असलेली आरती वेळा अमावास्येसाठी वडील प्रताप मोहिते यांच्याकडे मंगळवारी (ता.24) रात्री आली होती. तिने आपले सोन्याचे दागिने कपाटात ठेवले होते. प्रताप मोहिते यांच्या पत्नीचे दागिने असलेले लॉकर चोरट्यांना फोडता आला नाही.

श्री. मोहिते यांच्या घरानंतर चोरट्यांनी ज्ञानेश्वर प्रल्हाद जमादार यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांच्या घरातून सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळविली. तर शिवाजी निवृत्ती सगर यांच्या घरातील कपाट तोडून सात हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. श्रीमंत जाधव व दिनकर सगर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला; मात्र तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, उपनिरीक्षक विजयकुमार वाघ व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. मोहिते, जमादार कुटुंबाने पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक श्री. गुंडिले यांना माहिती दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

वीजपंप चोरीच्या घटना 

व्हंताळ, बेटजवळगा, एकुरगा शिवारात गेल्या आठ दिवसांपासून शेतातील वीजपंप चोरीला जात असल्याच्या घटना घडताहेत. व्हंताळ गावात भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या पाच घटनांनी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या दीड तासात सुमारे नऊ ते दहा लाखांचा ऐवज लुटण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. 

पोलिसांनी केली होती जागरूकता; पण... 

वेळा अमावास्यानिमित्त गावातील बहुतांश घरांना कुलूप असते. गावकरी कुटुंबीयांसमवेत शेतात जात असल्याने गावात शुकशुकाट असतो. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी गेल्या दिवसांत पत्रकाद्वारे, तसेच ऑटो रिक्षामध्ये भोंगा फिरवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता; परंतु चोरट्यांनी भरदिवसा घरे फोडून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. 

चोरट्याचा फंडा अन्‌ लोकांना गंडा 

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांत काही वर्षांत बंद घर फोडून चोरटे बिनधास्त चोरी करीत आहेत. या स्थितीत भुरटे चोर पकडून मोठी चोरी उघडकीस आणल्याचे पोलिस सांगताहेत. बंद घरे फोडण्याचा फंडा चोरट्यांनी वेळ अमावास्येदिवशी प्रभावीपणे अंमलात आणला. पोलिसांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पूर्वी केवळ शहराच्या ठिकाणी बंद घरात होणाऱ्या चोऱ्या आता ग्रामीण भागातही सुरू झाल्या आहेत. यामुळे घर बंद करून बाहेर जाण्यासाठी ग्रामस्थांना भीती वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com