चोरट्यांनी पळविली बियाणांची जीप 

तुकाराम शिंदे
Friday, 12 June 2020

अंबड येथून कपाशीसह इतर बी-बियाणे घेऊन जाणारी एक जीप चाकू दाखवून चोरट्यांनी गुरुवारी (ता.११)रात्री अकरा वाजेच्या सुमारास पळविली. दरम्यान, गोलापांगरीजवळ खांबाला ही धडकली. त्यामुळे चोरट्यांनी जीप सोडून पलायन केले. 

तीर्थपुरी (जि.जालना) - अंबड येथून कपाशीसह इतर बी-बियाणे घेऊन जाणारी एक जीप चाकू दाखवून चोरट्यांनी गुरुवारी (ता.११)रात्री अकरा वाजेच्या सुमारास पळविली. दरम्यान, गोलापांगरीजवळ खांबाला ही धडकली. त्यामुळे चोरट्यांनी जीप सोडून पलायन केले. 

तीर्थपुरी येथील कृषी व्यवसायिक व इतर शेतकरी जालना येथून कपाशीचे बी-बियाणे व इतर बी-बियाणे खरेदी गुरुवारी रात्री गावाकडे जीपमधून परतत होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अंबड येथील पेट्रोल पंपाजवळील ढाब्यावर ते जेवण करण्यासाठी थांबले.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

तेव्हा रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेवण आटोपून ते निघणार इतक्यातच दोन चोरट्यांनी चालक संजय खंडागळे यांच्या गळ्याला चाकु लावला. जीपची चावी काढून घेतली. चोरट्यांनी जीपमध्ये बसून ती जालन्याच्या दिशेने नेली. तेव्हा जीपमधील विलास उढाण यांनी विरोध केला. तेव्हा मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील चोरटे जीप घेउन पसार झाले. दरम्यान, ही जीप जालना मार्गावरील गोलापांगरीजवळ एका खांबावर धडकली. त्यामुळे चोरट्यांनी जीप तेथेच सोडून पळ काढला.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

या घटनेत विलास उढाण हे मारहाणीत जखमी झाले. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

मोदीखाना परिसरात गुटखा जप्त

जालना -  शहरातील मोदीखाना परिसरात एका कारसह लाखो रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता.दहा) जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
शहरातील मोदीखाना परिसरात बुधवारी (ता.दहा) एक कारमध्ये गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका कारमध्ये विविध कंपन्यांचा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी कार आणि गुटखा असा सहा लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित शेख अब्दुल खालेक शेख अब्दुल सलाम, शेख अलीम शेख अजीज या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हा गुटखा शेख ताहेर शेख अकबर, शेख वाहुजोद्दीन शेख बद्रोद्दीन या दोघांकडून आणल्याची कबुली दिली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. हा गुटखा सतीश ऊर्फ लाला प्रकाश जैस्वाल (रा. गोपीकिशननगर, जालना) याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी या पाचही जणांवर सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती रोडे, सहायक फौजदार एम. बी. स्टॉक, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विलास चेके यांनी केली. 

मटका बुकीवर छापा 

जालना - शहरातील मंगळबाजार परिसरात सुरू असलेल्या मटक्याच्या बुकीवर अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने गुरुवारी (ता.११) छापा टाकला. याप्रकरणी तीनजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील मंगळबाजार परिसरात मटक्याची बुकी सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांना मिळाली. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून बुकीमालक संशयित शिवलिंग छगनअप्पा वीर (रा. बारवार गल्ली, जालना), युनूस सय्यद बशीर सय्यद, बादशाह खान या तिघांना ताब्यात घेतले असून एक हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी या तिघांविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे, उमेश लाभंगे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of vehicle in Ambad