नोकऱ्या नाहीत... छेऽऽऽ लागलेली करवेना! 

दत्ता देशमुख
Tuesday, 7 July 2020

  • कोविडसाठी नेमणुकीकडे ४७ उमेदवारांची पाठ 
  • नव्याने नियुक्त्या दिलेल्यांपैकी किती रुजू होणार याबाबतही साशंकता 
  • रुग्णसंख्या वाढली तर जिल्ह्यात १५४३ पदांची भरती 
  • सद्यःस्थितीत आरोग्य विभाग करतोय १७८ पदांची भरती 

बीड  - नोकऱ्या नसल्याची ओरड नवी नाही, त्यात आता कोरोना विषाणू फैलावाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये तर ही ओरड भलतीच वाढली आहे; पण याच कोविड- १९ च्या अनुषंगाने आरोग्य विभाग करीत असलेल्या विशेष भरतीत कंत्राटी व करारपद्धतीच्या नोकरीकडे उमेदवार पाठ फिरवीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे एकीकडे सोशल मीडियावर सर्वचजण कोरोना योद्धे म्हणून मिरवत असताना दुसरीकडे अशी पाठ दाखवणे किती भूषणावह आहे, असाही प्रश्न पडला आहे. 

कोविड- १९ अंतर्गत रिक्त पदांवर कंत्राटी व करार पद्धतीने आरोग्य विभागाने मानधन तत्त्वावर हाती घेतलेल्या भरती मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात ४७ जणांनी पाठ फिरवली आहे. नुकतेच पुन्हा ७४ जणांना नेमणुका दिल्या असून, त्यातील किती लोक रुजू होणार, याबाबतही साशंकता आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने बांधलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रुग्णसंख्या खूपच वाढली तर तब्बल १५४३ पदांची भरती होणार आहे. सद्यःस्थितीतील रुग्णसंख्या व कार्यान्वित असलेले कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटलमध्ये १७८ पदांची आवश्यकता आहे. त्यानुसार कंत्राटी व करार पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. 

हेही वाचा - मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, बलिदान देणाऱ्यांचा विसर​

कोविडची नोकरी नको रे बाबा.... 
कोरोना विषाणूचा फैलाव झाला आणि आरोग्य विभागाने उपाय योजनांना सुरवात केली. भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यानंतर अलगीकरण, विलगीकरण, स्वॅब घेणे, उपचार अशा आरोग्यविषयक कामांसाठी जिल्ह्यात १५४३ पदे कंत्राटी व करार पद्धतीने भरण्याचे नियोजन केले. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर अशा ठिकाणी फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डीईओ व वॉर्डबाय अशा पदांची ही भरती असेल.

हेही वाचा - खतासाठी पैसे मिळाले नाहीत, बीडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, सध्याचे रुग्ण व कार्यान्वित विविध कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर; तसेच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या अलगीकरण व विलगीकरण कक्षांसह अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेसाठी वरीलपैकी फिजिशियन वगळता १७८ पदे भरण्यास उपसंचालकांनी मागविलेल्या अर्जांपैकी सिनिॲरिटीनुसार १७८ पदे भरण्यास मंजुरीही दिली. त्यानुसार आरोग्य विभागाने प्रक्रिया सुरू केल्यानंतर नियुक्ती दिलेल्यांपैकी ४७ लोक रुजूच झाले नाहीत. तर काहींनी तीन-चार दिवसांनंतर काढता पाय घेतला. रुजू न झालेल्यांत वैद्यकीय अधिकारी, आयुष अधिकारी, स्टाफ नर्स व वॉर्डबॉयचा समावेश आहे. यात मानधन का असेना पण बरे आहे. नोकरी नाही अशी ओरड असताना किमान मानधनावरील नोकरी आणि अनुभव तरी पाठीशी राहिला असता. तरीही याकडे पाठ दाखविली जात आहे. 

हेही वाचा - बीड, केज, परळीत बियाणे कंपन्यांविरुद्ध सहा गुन्ह दाखल​

या ठिकाणी रुजू झाले नाहीत उमेदवार 
अंबाजोगाईच्या कोविड केअर सेंटरसाठी २१ लोकांना नियुक्त्या दिल्या; पण यातील सहा उमेदवार रुजू झाले नाहीत. बीडमध्ये मात्र सर्व उमेदवार रुजू झाले. अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३२ लोकांना नेमणुका दिल्यानंतर यातील नऊ लोक रुजू झाले नाहीत. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये ३० उमेदवारांना नेमणुका दिल्या; पण यातील १३ उमेदवार रुजू झाले नाहीत. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात १६ पैकी सात, तर केजमध्ये १६ पैकी आठ उमेदवार रुजू झाले नाहीत. अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेसाठी १५ उमेदवारांना नियुक्त्या दिल्यानंतर चार लोक रुजू झाले नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no jobs ... Don't get caught!