वाचन संस्कृतीवर आली अवकळा, कशामुळे ? ते वाचा

प्रमोद चौधरी
गुरुवार, 26 मार्च 2020

मुलांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनाची गोडी लहानपणी लागलेली महत्त्वाची. मात्र, बदलत्या आधुनिक काळात वाचन संस्कृती लोप पावल्याचे चित्र आहे.

नांदेड :  साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्मदिवस सर्वत्र वाचन दिन म्हणून साजरा होतो. परंतु, एका दिवसापुरतेच वाचनसंस्कृतीच्या गप्पा, उपक्रम राबविले जातात. दुसऱ्या दिवसापासून याकडे दुर्लक्ष होते. परिणामी वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा ही आज चिंतेची बाब झाली आहे.

लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा, तसा घडत जातो. मुलांच्या वाढत्या वयात पालक व शिक्षक या दोघांचाही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. वाचन, श्रवण, निरीक्षण व लेखन अशा विविध माध्यमांतून मुलं सतत शिकत असतात. यापैकी वाचन मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचाच टप्पा. विविध विषयांतील वाचन फक्त आनंदच देत नाही, तर त्यामुळे स्वविकासही साधता येतो. मुलांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनाची गोडी लहानपणी लागलेली महत्त्वाची. मात्र, बदलत्या आधुनिक काळात वाचन संस्कृती लोप पावल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - भाऊराव चव्हाण साखर कारखाना बंद होणार- तिडके

मुले वाचनापासून दूरच
आज पुस्तकांची वाचन संस्कृती काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. लहान्यांपासून ते तरूण मंडळी पुस्तक वाचताना कधीच दिसत नाही. आधुनिक काळाच समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. याच माध्यमातून मुलांना माहिती मिळत असली, तरी बहुतेकदा अपूर्ण माहितीच समोर येते. त्यामुळे कधी कधी संदर्भ चुकल्याने वादावादीचे प्रसंग ओढविल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हावा, तसे वातावरण असणेही गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक व ग्रंथपाल सर्वांनाच महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. पालकांनी छोट्या छोट्या गोष्टी असलेली पुस्तके मुलांना झोपताना नियमित वाचून दाखवावीत. जेणेकरून बालकांमध्ये वाचन संस्कृती पुन्हा तयार होईल.

पालकांनी मार्गदर्शन करावे
मुलांनी पुस्तके वाचावीत, म्हणून काही पालक भरपूर पुस्तके आणून देतात. परंतु, त्यातली नक्की किती पुस्तके मुले वाचतात, याकडे बऱ्याचदा लक्ष दिले जात नाही. काही पाने चाळल्यावर मुलांचे कुतूहल संपते आणि पुस्तके कोपऱ्यात ढकलली जातात. नवीन काहीतरी सुरु करून अर्धवट सोडणे हा मुलांचा स्वभावधर्मच आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक आणून देऊन पालकांनी वाचनाबाबत मार्गदर्शन करायला हवे.

हे देखील वाचायला पाहिजे - सरपंचाची प्रवाशांना विनंती कशासाठी? ते वाचा

घरात छोटे वाचनालय हवे
मुलांना आपल्या मोठ्यांपासून पुस्तक वाचनाची सवय लागते. सध्या मुलांच्या अवतीभोवती पुस्तके सोडून इतर सर्व गोष्टी आल्या आहेत. पुस्तके वाचनाची सवय मुलांना लावायची असल्यास घरात छोटे वाचनालय गरजेचे आहे. त्यातही वयोमानानुसार पुस्तकापासून तर आत्मचरित्र, ग्रंथांपर्यंत सर्व गोष्टी असायला हव्यात. कारण प्रत्येक पुस्तक काही तरी वेगळे सांगून जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Was a Crisis on Reading Culture Nanded News