esakal | परभणीच्या या आमदारांना कोरोनाची लागण- संपर्कातील लोकांचे धाबे दणाणले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे

परभणीच्या या आमदारांना कोरोनाची लागण- संपर्कातील लोकांचे धाबे दणाणले

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना विषाणु संसर्ग झाला आहे. औरंगाबाद येथे करण्यात आलेल्या रॅपीट अॅन्टीजन टेस्टमध्ये ही बाब समोर आली आहे. आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.

आमदार बाबाजानी दुर्राणी यांना (ता. १३) पासून ताप व सर्दीचा त्रास होत होता. त्यामुळे ते (ता. १४) पासून कुणाच्याही संपर्कात आले नव्हते. ते घरातच होते. परंतू शुक्रवारी (ता. १७) त्यांना त्रास वाढल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. १८) सकाळी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. तो स्वॅब पॉझिटीव्ह आसल्याचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला. त्यानंतर त्यांना तातडीने कोरोना कक्षात हलविण्यात आले आहे अशी माहिती त्यांच्या नजिकच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे पाथरी येथील निवासस्थान प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यांच्या नजिकच्या नातेवाईकासह समर्थकांची तपासणी केली जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नजिकच्या नातेवाईकांनी दिली.

हेही वाचाअर्रारर : कोरोना तपासणी प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव

पालकमंत्र्यांच्या बैठकीलाही अनुपस्थित 

आमदार बाबाजानी दुर्राणी हे जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या जिल्ह्यात झालेल्या दोन दिवशीय दौ-यापासून दूर होते. पालकमंत्र्यांनी दौऱ्या दरम्यान लोकप्रतिनिधी व इतरांच्या भेटी घेतल्या. परंतू  भेटी आणि बैठकीपासून ते आमदार बाबाजानी दुर्राणी हे दूर होते. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकांना देखील ते उपस्थित नव्हते. तसेच आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस दोनच दिवसापूर्वी होता. परंतू प्रकृती बरोबर नसल्याने त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करण्याचे सांगितले होते. वाढदिवसाच्या दिवशी देखील आमदार बाबाजानी दुर्राणी हे कुणालाही भेटले नाहीत.

समर्थक कार्यकर्त्यासह अनेकाच्या मनात भिती

आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणजे कायम लोकांच्या संपर्कात राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्याच्या निवासस्थानासह पाथरी शहरातील संपर्क कार्यालयात दररोज कार्यकर्त्याचा राबता असतो. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील पदाधिकारी देखील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या सातत्याने संपर्कात असतात. शनिवारी त्यांचा पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर त्यांच्या समर्थकांसह इतर पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या नजिकच्या नातेवाईकासह इतरांच्या तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.