दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

महेश गायकवाड
Thursday, 21 May 2020

आता टाळेबंदीचा कालावधी वाढत असल्याने आणि समाजाकडून मिळणारी अन्नधान्याची मदत कमी झाल्याने पुन्हा त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.
त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून जवळपास दोन महिन्यांपासून बंद झालेली टाळी सुरू झाली आहे.

जालना - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गेल्या दीड महिन्यापासून लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्व सामान्य माणसाला जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. टाळी हेच जीवन असलेल्या तृतीयपंथी समाजातील व्यक्तींचेही या काळात मोठे हाल झाले. शासनाने आता लॉकडाउन शिथिल केल्याने रस्त्यावर वाहने धावू लागली. त्यामुळे शहराबाहेरील चौकात तृतीयपंथीयांची टाळी पुन्हा वाजू लागली आहे.

कोरोनाच्या संकटात गरीब, कष्टकरी, मजूर वर्गाबरोबर उपेक्षित घटकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात या घटकांना अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, सेवा भावी संस्था, दानशूर व्यक्तींनी आधार दिला. तृतीयपंथी समाजातील व्यक्तींवरही लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली होती. मात्र, शहरातील सामाजिक कार्यकर्ते व दानशुरांनी त्यांना मदतीचा हात दिला.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

आता टाळेबंदीचा कालावधी वाढत असल्याने आणि समाजाकडून मिळणारी अन्नधान्याची मदत कमी झाल्याने पुन्हा त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.
त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून जवळपास दोन महिन्यांपासून बंद झालेली टाळी सुरू झाली असून जालना शहराबाहेरील चौकात सायंकाळी उभे राहून ही मंडळी आपली पोटा-पाण्याची सोय करताना दिसत आहेत.

हेही वाचा : मिळाले तर दोन घास खायचे, चालत राहायचे... 

मालवाहू वाहने रस्त्यावर धावत असल्याने या वाहनांचे चालक तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत करत आहेत. हे करताना ही मंडळी तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून स्वतःची काळजीही घेत आहेत.

आमच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही. त्यामुळे आम्हांला शासकीय सुविधा उपलब्ध होत नाही.त्यामुळे आम्ही आमची होणारी उपासमार होऊ नये म्हणून पुन्हा टाळी सुरू केली आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे.
- अक्षरा ताडगे,तृतीयपंथी‌‌‌ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third gender on road after two months