जालन्यातील १३ घंटागाड्या नादुरूस्त, कचरा संकलनास लागतो वेळ

उमेश वाघमारे
Tuesday, 22 December 2020

जालना नगरपालिकेच्या तीन घंटागाड्या या कायम स्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत.

जालना : जालना नगरपालिकेच्या तीन घंटागाड्या या कायम स्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. तर इतर १३ घंटागाड्या नादुरूस्त आहे. त्यामुळे कचरा संकलनास वेळ लागतो, अशी माहिती स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठक देण्यात आली आहे. नगराध्यक्षा संगीत गोरंट्याल यांच्या दालनामध्ये सोमवारी (ता.२१) त्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्सारी फरहाना, सभापती छाया वाघमारे, सोनाली चौधरी, मनिषा कांबळे, वैशाली जांगडे, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

 

 

या स्थायी समितीच्या बैठकीत सहा विषय ठेवण्यात आले होते. या सहा ही विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान शहरातील कचरा संकलनास घंटागाड्या येत नसल्याचे तक्रारी येत असल्याचे सदस्यांकडून प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी अधिकाऱ्यांकडून १३ घंटागाड्या नादुरूस्त असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कचरा संकलन सुरळीत करण्याचे नगराध्यक्षा संगीत गोरंट्याल यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या.
बैठकीत शासन निर्णयानुसार विकास कामांना व संविदांना द्विसदस्यीय समितीने मान्यता दिलेल्या दरपत्रके सादर करण्यात आले.

 

 

क्रिसील संस्थेमार्फत नगरपालिकेची व्यवसाय विकास रेटींग्ज करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. पालिकेतील जनरेटर दुरुस्तीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. अग्निशमन विभाग व भांडार, विद्युत विभागात नवीन इंटरनेट जोडणीस मान्यता देण्यात आली. नगरपालिका कार्यालय व मुख्याधिकारी निवासस्थान येथे वायफाय इंटरनेट जोडणी नूतनीकरणास मान्यता दिली गेली तसेच जलशुद्धीकरण केंद्रास विरंजक चूर्ण व तुरटी पुरवठा करण्यास प्राप्त दरपत्रकास मान्यता देण्यात आली.

 

दहा मिनिटांमध्ये संपली बैठक
नगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये एकूण सहा विषय ठेवण्यात आले होते. या विषयांचे वाचन करून त्याला मंजुरी देत अवघ्या दहा मिनिटांमध्ये स्थायी समितीची बैठक संपली.

 

 

घंटागाड्याबाबत वाढत्या तक्रारी
नागरिकांकडून घंटागाड्या वेळ येत नाही, अशी तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी नगरपालिकेतून किती वाजता घंटागाड्या बाहेर पडतात यावर लक्ष ठेवावे. तसेच कचरा डेपो येथे घंटागाड्यांची नोंद घ्यावी, असे आदेश यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen Garbage Collection Vehicles Not Work Jalna News