धर्मादाय संस्थांकडून तीन हजार लेकींच कन्यादान

हरी तुगावकर
रविवार, 13 मे 2018

गरीब, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता वाटत होती. या सोहळ्यामुळे धर्मादाय संस्थांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. मदतीसाठी हजारो हात पुढे आले. घरचे कार्य म्हणून सर्वांनी काम केले. अवघ्या दीड महिन्यात तीन हजार लग्न लावण्यात यश आले. या पुढेही असेच उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

- शिवकुमार डिगे, राज्य धर्मादाय आयुक्त.

लातूर : मुलीचं लग्न म्हटले की बापाची वाढणारी चिंता, लग्नासाठी होणारा लाखोंचा खर्च, कर्ज काढून करावे लागणारे लग्न, कर्जाचा डोंगर घेऊन जगावे लागणारे जीवन, त्यातून येणारी नैराश्यता, प्रसंगी मृत्यूलाही कवटाळण्याचे घडत असलेले प्रकार ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. हे लक्षात  आल्यानंतर राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून राज्यभर सामूहिक विवाहसोहळे झाले.

यात तीन हजार 46 लेकींचे कन्यादान करण्यात आले. यातून डिगे आणि त्यांचे राज्यभरातील सहकारी या लेकींचे आईबापच बनले होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या सोहळ्यांनी सामाजिक सलोखा जपत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

संस्थाचा पैसा काढला बाहेर

मुलीच्या लग्नासाठी पैसा नसल्याने बापाने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तर दुसरीकडे अनेक धार्मिक, धर्मादाय संस्थाकडे पैसा पडून आहे, हे डिगे यांच्या लक्षात आले. या पैशाचा योग्य वापरासाठी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना अमलात आणली. दोन जिल्हे वगळता प्रत्येक जिल्ह्यात असे सोहळे पार पडले. 3 हजार 46 मुलींचे कन्यादान करण्यात आले. सर्व व्यवस्था संस्थांनी केली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील मुला-मुलींचे लग्न लाऊन सामाजिक सलोखा जपण्यात आला. अभिनेत्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनी या सोहळयांना हजेरी लावली.

गरीबांचे 200 कोटी वाचले

गरीब कुटुंबियातील लग्न म्हटले तरी वधू वरांच्या दोन्ही बाजूने किमान सहा-सात लाख रुपये खर्च येतो. याकरता कर्ज काढून मुलीचे लग्न लावले जातात. येथे तर 3 हजार 46 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. एक पैसाही खर्च वधूवरांना आला
नाही. यातून राज्यभरातील गरीब कुटुंबियातील या लग्नाच्या खर्चाचे किमान 200 कोटी रुपये वाचले आहेत. हे या सोहळ्यांचे यश आहे.

300 क्विंटल धान्याची नासाडी वाचली

लग्न म्हटले की अक्षता आल्याच. प्रत्येक लग्नात किमान दहा किलो तरी धान्यापासून अक्षता तयार केल्या जातात. एकप्रकारे ती नासाडीच असते. पण या सोहळ्यात त्याला फाटा देण्यात आला. अक्षता म्हणून सर्वांना फुले देण्यात आली. यातून 300 क्विंटल धान्याची होणारी नासाडी मात्र वाचली आहे.

Web Title: Thousands of Kanyadan from charity institution