परभणी तालुक्यात सोमवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

परभणी तालुक्यातील झरी येथील एका कुटुंबात नाशिक येथील घोटी परिसरातील एक व्यक्ती झरी येथे शनिवारी (ता. २०) आला होता. त्याने या गावात दोन दिवस मुक्काम ही केला होता. त्यानंतर तो परत नाशिक येथे परतला. नाशिक येथे गेल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.

परभणी : झरी (ता. परभणी) येथील तिघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी (ता. २९) जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. नाशिक येथील कोरोनाबाधित नातेवाइकांच्या संपर्कात आल्याने या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, तिघे कोरोनाबाधित आढळल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर १३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
परभणी तालुक्यातील झरी येथील एका कुटुंबात नाशिक येथील घोटी परिसरातील एक व्यक्ती झरी येथे शनिवारी (ता. २०) आला होता. त्याने या गावात दोन दिवस मुक्काम ही केला होता. त्यानंतर तो परत नाशिक येथे परतला. नाशिक येथे गेल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे या नातेवाइकांच्या संपर्कात आलेल्या झरी येथील तिघांना ता. २७ जून रोजी क्वारांटाइन करण्यात आले होते. या तिघांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी (ता. २९) प्राप्त झाला. त्यातील तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा : Video: युवक काँग्रेसची परभणीत पेट्रोलपंपासमोर निदर्शने -

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११२ वर पोचली असून ९० कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

झरी येथील १३ जण क्वरंटाइन
झरी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्या तिघांच्या संपर्कात आलेले इतर १३ जणांना सोमवारी (ता. २९) क्वरंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती झरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा : आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी माणुसकी धावली -

 रविवार चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले
परभणी  जिल्ह्यात रविवारी (ता.२८) चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या चार रुग्णांपैकी दोन रुग्ण परभणी शहरातील असून एक सोनपेठ व एक जिंतूर शहरातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरवात झाली असून रविवारी (ता. २८) अचानक चार रुग्ण वाढल्याने आता रुग्णसंख्या १०९ वर गेली आहे. परभणी शहरातील गव्हाणे चौक परिसरातील एक व दर्गारोडवरील गंगापुत्र कॉलनीतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तिसरा रुग्ण हा राजगल्ली सोनपेठ, तर जिंतूर शहरातील बामणी प्लॉट भागात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या परभणी जिल्हा रुग्णलायात १५ रुग्ण उपचार घेत आहेत.

चार ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र
शहरात व तालुक्याच्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चार ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three corona positive in Parbhani taluka on Monday Parbhani News