कळंब तालुक्यात तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होणार बिनविरोध

दिलीप गंभीरे
Thursday, 31 December 2020

कळंब  तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयामध्ये बुधवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत इच्छुकांसह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

कळंब (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयामध्ये बुधवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत इच्छुकांसह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. काही ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी पुढाऱ्यांनी प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांना काही ठिकाणी यश आले. अंतर्गत जागा वाटप करून काही ठिकाणी डमी अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा, आडसुळवाडी, दुधाळवाडी या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

 

 

 

लहान ग्रामपंचायती शक्यतो बिनविरोध काढणे कठीण असते. जेवढ्या जागा तेवढे अर्ज दाखल झाले आहे. कुणी चुकून अर्ज दाखल करतो का यावर गावातील कार्यकर्ते लक्ष रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयात ठाण मांडून होते. गावातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच निवडणुकीला होणार खर्च यामुळे या गावातील नागरिकांनी गटतट, हेवेदावे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बिनविरोध काढण्यास गावातील प्रतिष्ठित नागरिक, नेते, कार्यकर्त्यांना यश आले आहे.

 

 

 

असे आले उमेदवारी अर्ज
तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या ४९५ सदस्यासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत बुधवार (ता. ३०) १ हजार ३५५ इच्छुक उमेदवाराचे अर्ज दाखल झाले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती.ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्व्हरच्या खोड्यामुळे निवडणूक विभागाने ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.अर्ज भरताना चुकू नये किंवा इच्छुकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पॅनलमधील तज्ज्ञांचीही उपस्थिती होती.

तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० डिसेंबर ही अंतिम तारीख होती. त्यामुळे इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दुचाकी,चारचाकी वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. इच्छुकांसह कार्यकर्त्यांच्या गर्दीने तहसील कार्यालय परिसर फुलून गेला होता. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस बंदोबस्त होता. रात्री आठपर्यंत अर्ज इच्छुकांची तहसील कार्यालयात गर्दी होती. साडेपाचपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते. अर्जावर समक्ष उमेदवाराची स्वाक्षरी करण्यासाठी उमेदवारासह कार्यकर्ते ताटकळत बसले होते.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Grampanchayat Election Of Kalamb Taluka Unopposely Osamanabad News