जालन्यात कोरोनाचा नववा बळी

उमेश वाघमारे 
Thursday, 18 June 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या नऊ झाली आहे. तालुक्यातील जामवाडी येथील मृताचा अहवाल बुधवारी (ता. १७) पॉझिटिव्ह आला आहे. तर सात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बाधित रुग्णसंख्या ३१६ वर पोचली आहे.

जालना -  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या नऊ झाली आहे. तालुक्यातील जामवाडी येथील मृताचा अहवाल बुधवारी (ता. १७) पॉझिटिव्ह आला आहे. तर सात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बाधित रुग्णसंख्या ३१६ वर पोचली आहे. सुखद बाब म्हणजे बुधवारी (ता.१७) सातजण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १९२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या जाफराबाद येथील राममंदिर परिसर, जालना शहरातील संभाजीनगर येथील, लक्कडकोट, मोदीखाना येथील प्रत्येकी एक रुग्ण व लक्ष्मीनारायणपुरा परिसरातील तीन असे एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर बुधवारी (ता.१७) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

जालना शहरातील समर्थनगर परिसरातील एक, राज्य राखीव पोलिस दलातील एक जवान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक डॉक्टर, भाग्यनगर परिसरातील एक, जामवाडी (ता. जालना) येथील एक, नानक निवास येथील एक, जाफराबाद येथील आदर्शनगरातील एक असे एकूण सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

जामवाडी (ता. जालना) येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला आजारी असल्याने जवळील एका खासगी रुग्णालयात चार ते पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते;  प्रकृती सुधारत नसल्याने त्याना शहरातील एका खासगी रुग्णालयात ता. १६ जून रोजी दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला सामान्य रुग्णालयात ता. १६ जून रोजी रेफर केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविले होते. बुधवारी (ता. १७) अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. 

आतापर्यंत ३१५ जण संस्थात्मक अलगीकरणात 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ३१५ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ९८, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २५, जालना येथील संत रामदास वसतिगृह येथे ३०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २३, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह येथे ३५, भोकरदन येथील मुलींचे शासकीय वसतिगृह येथे दोन, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे आठ, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३६, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १४, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दोन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सहा, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १३, जाफराबादच्या पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १२, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे आठ व जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे तीनजणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total nine deaths of Corona in Jalna