आष्टीच्या व्यापाऱ्याला साठ लाखांना फसविले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

  • गहू खरेदीच्या करारात फसवणूक
  • इंदूरच्या व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा 
  • मागील वर्षी 20 नोव्हेंबरला करार
  • दाेन दलालांमार्फत दिली रक्कम

आष्टी (जि. बीड) - गहू खरेदीच्या करारात आष्टी येथील व्यापाऱ्याची 60 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर (मध्य प्रदेश) येथील व्यापाऱ्यासह दोघांवर न्यायालयाच्या आदेशाने आष्टी पोलिसांत गुरुवारी (ता. 28) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येथील एमआयडीसी परिसरात अडत मालाची प्रक्रिया करून खरेदी-विक्री करीत असलेले व्यापारी ईश्‍वर शिंगटे यांनी कडा येथील विठ्ठल सोनवणे व गोरेगाव येथील तेजस मुन्शी या दलालांमार्फत इंदूर येथील व्यापारी विजय यादव यांच्यासोबत मागील वर्षी 20 नोव्हेंबरला गहू खरेदीचा करार केला. करारापोटी शिंगटे यांनी वर्षभरात वेळोवेळी धनादेश व आरटीजीएसच्या माध्यमातून 60 लाख रुपये त्यांच्या बॅंक खात्यात भरले. दोन्ही दलालांनाही त्यांचे कमिशन देण्यात आले. 

हेही वाचा - बीडमधून धनंजय मुंडे की सोळंके, मंत्रिपद कुणाला?

दरम्यान, शिंगटे यांना वर्षभरात गहू मिळाला नाही. गव्हाची मागणी केली असता माल शिल्लक नाही, नंतर पाठवतो अशी उडवाउडवीची कारणे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शिंगटे आष्टी पोलिसांत गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंगटे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यांनीही दखल न घेतल्याने शिंगटे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. 

हेही वाचा - बालानगरच्या रानमेव्याची वाटसरूंना गोडी

यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी (ता. 28) रात्री दलाल विठ्ठल सोनवणे व तेजस मुन्शी यांच्यासह व्यापारी विजय यादव या तिघांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक भारत मोरे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The trader cheated sixty lakhs