उपाशी मरण्यापेक्षा कोरोनाने मरू

कृष्णा पिंगळे
रविवार, 31 मे 2020

अडीच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे व्यापारी अस्वस्थ

सोनपेठ (जि.परभणी) : अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे छोट्या व फिरत्या व्यापाऱ्यांची पुरती दैना झाली आहे. दररोजच्या दररोज हातावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गेले अडीच महिने आपले घर चालवताना होती नव्हती तेवढी शिल्लक संपवून टाकली. आता उधारदेखील कोणी द्यायला तयार नसल्याने उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोनाने मरू, असे उद्विग्न उद्गार एका छोट्या व्यापाऱ्यांने ‘सकाळ’शी बोलताना काढले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यांपासून सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांसह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची प्रचंड हाल होत आहेत. शासनाने चौथ्या लॉकडाउनमध्ये काही दुकानांना सूट दिली असली तरी बहुतांश बाजारपेठा बंद असल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. ऐन हंगामात आलेल्या लॉकडाउनमुळे व्यापारी वर्ग पुरता मोडून पडला आहे. अनेक दिवसांपासून दुष्काळाच्या झळा सोसलेला व्यापारी या वर्षी कोरोनामुळे कोलमडून पडला आहे.

उपासमारीची वेळ

व्यापाऱ्यांना अडीच महिन्यांपासून व्यापार बंद असला तरी दुकान भाडे, वीजबिल, नोकरांच्या पगारी, खरेदी केलेल्या मालाची उधारी द्यावी लागत आहे. अनेक फुटकळ व छोट्या व्यापाऱ्यांवर तर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. कपडा, जनरल स्टोअर्स, हॉटेल, पानटपरी, केश कर्तनालय, फिरते व्यापारी, शिलाई कामगार, गॅरेज, ऑटोमोबाइल अशा अनेक दुकाने बंदच असल्यामुळे ही दुकाने व त्यावर अवलंबून असणारे हजारो कुटुंब या अडीच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यातच आता सरकारने दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यामुळे इतर व्यावसायिकांना मात्र, यातून वगळल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. सरकार आता पाचव्या लॉकडाउनच्या दिशेने पावले उचलत असल्याने व्यापारी वर्ग चांगलाच हवालदिल झाला आहे.

हेही वाचा : कळमनुरीत बारा हजार गावकऱ्यांची घरवापसी -
 

परवानगी द्यावी
टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटी सरकारने देशी दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी दिली. परंतु, इतर दुकाने बंदच ठेवल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सरकारने आता लॉकडाउन वाढवताना नागरिकांना सामाजिक बंधने घालून सर्व प्रकारच्या आस्थापना चालवण्यास परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :हिंगोली जिल्ह्यात बरसला पाऊस -

हेही वाचा ...
गंगाखेड येथे महिलेस मारहाण
गंगाखेड (जि.परभणी) :
शहरातील आफताफ कॉलनी या ठिकाणी रस्त्यातील दुचाकी काढण्यासाठी हात गाडीवाल्याने विनंती केली असता दोन जणांनी एका महिलेस मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ३०) सायंकाळी घडली.
शहरातील आफताफ कॉलनी येथील हातगाड्यावाला दिवसभर भाजीपाला विकून शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान, आफताफ कॉलनी या ठिकाणी आला असता रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकी बाजूला घ्या, अशी विनंती आरोपी रमजान कुरेशी यांना केली असता रमजान कुरेशी यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केल्यानंतर पीडितेची पत्नी फिर्यादी शेख रब्बाना शेख दस्तगीर (वय ३२, रा. आफताफ कॉलनी) यांनी शिव्या देऊ नका, असे म्हणल्यानंतर रमजान कुरेशी व रिजवान कुरेशी यांनी शेख शबाना यांना हातातील कत्तीने पाठीत मारहाण केल्याची घटना घडली. फिर्यादी शेख रबाना शेख दस्तगीर यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस स्टेशन येथे आरोपी रमजान रमजान व रिजवान कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरणाचा पुढील तपास जमादार प्रवीण कांबळे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders upset over two-and-a-half-month lockdown Parbhani News