बाजार समित्यामधील व्यवहार ठप्पच

कृष्णा जोमेगावकर
गुरुवार, 9 एप्रिल 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना शहरातील किराणा दुकानादारांनी भुसार दुकानात काही दिवसाचा माल शिल्लक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगीतले होते. यामुळे शहरासह जिल्ह्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी भुसारमाल बाजार समित्यांमध्ये येणे गरजेचे होते.

नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी लोकांची गर्दी होवू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील धान्य खरेदी बंद केले होते. परंतु शहरासह जिल्ह्यात अन्नधान्याचा तुटवडा पडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामधील व्यवहार सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. २८ मार्च रोजी दिले होते. परंतु अनेक अडचणीमुळे बाजारातील व्यवहार अद्याप सुरु झाला नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, अडते, खरेदीदार यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतली होती. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी (संस्था) प्रविण फडणीस, नांदेड बाजार समितीचे सचिव डी. ए. संगेकर, धर्माबादचे सी. डी. पाटील, भोकरचे श्री पुंजेकर, लोहाचे श्री घोरबांड, कंधारचे श्री वंजे, नायगावचे कदम यांच्यासह बिलोली, कुंडलवाडी, देगलूर अशा दहा ते बारा बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते.

हेही वाचा....संत बाबा नरेंद्रसिंघ, संत बाबा बलविंदरसिंग यांची लंगरसेवा

अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होवू नये

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना शहरातील किराणा दुकानादारांनी भुसार दुकानात काही दिवसाचा माल शिल्लक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगीतले होते. यामुळे शहरासह जिल्ह्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी भुसारमाल बाजार समित्यांमध्ये येणे गरजेचे होते. यामुळे शनिवारी जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत सर्व बाजार समिती सचिवांची बैठक घेतली होती.

हेही वाचलेच पाहिजे....Video : वर्तमानपत्र वाचनाच्या भूकेकडून समाधानाकडे

नांदेड बाजार समितीचा व्यवहार ठप्पच
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामुख्याने हळदीची आवक होते. नांदेडसह परभणी तसेच हिंगोली जिल्ह्यातील हळद या बाजार समितीमध्ये येते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर येथील व्यवहार बंद आहे. बाजार सुरु करण्यासाठी प्रशासनाने जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, सचिव डी. ए. संगेकर यांना सुचना केली होती. यासाठी बाजार समितीकडून व्यापाऱ्यांची बैठकही घेतली. परंतु हळदीचा व्यवहार करण्यासाठी अधीक मनुष्यबळ लागते. यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होइल, या भितीने व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याची माहिती मिळाली. 

खरेदी-विक्री करताना काळजी घेण्याचे निर्देश
बाजार समित्यांनी गर्दी टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुन शेतीमाल खरेदीला सुरवात करावी. शेतीमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांनी सुविधा पुरवाव्या. हात धूण्यासाठी पाणी तसेच साबणाची व्यवस्था करावी, बाजार समितीचे एकच प्रवेशव्दार उघडून ठराविक शेतकऱ्यांना प्रवेश द्यावा, मुख्य ठिकाणी माहिती असलेले बॅनर लावावे, बाजार समिती आवारात स्वच्छता राखावी, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या होत्या.

काही प्रमाणात व्यवहार सुरु 
नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचा व्यवहार करण्यासाठी अधीकचे लोक लागतात, यामुळे व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नाहीत. परंतु भोकर, नायगाव, मुखेड यासह इतर बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात व्यवहार सुरु झाला आहे.
- प्रविण फडणीस, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नांदेड. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transaction jam in market committees, nanded news