कशामुळे बळी ठरताहेत वृक्ष, ते तुम्ही वाचाच

File photo
File photo

नांदेड : जाहिरातींसाठी वृक्षांवर खिळे ठोकण्यात येत असून, त्यावर विविध प्रकारच्या जाहिराती, बॅनर, फलके लावण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरीदेखील याकडे प्रशासनातील कोणाचेही लक्ष का जात नाही? असा प्रश्न आता जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, पक्षीही आळवीती सुस्वरे’, या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी वृक्षांचे महत्त्व व त्यांचा मानवाच्या जीवनाशी असलेला गाढा संबंध दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता आधुनिकीकरणाच्या वेडाने पछाडलेल्या मानवाला त्यांचा दिवसेंदिवस विसर पडत चालला आहे. मार्केटींगच्या जगात जाहिरात मोठी, तर तिचा खपही मोठा, असे समीकरण आहे. जाहिरातींसाठी पोस्टरबाजी करायची, तर त्यासाठी मोकळी जागाही नाही. म्हणून झाडे असली की बॅनर लावायचे, ठोका झाडावर खिळे असे प्रकार वाढत आहेत. अशा मुक्या झाडांवर फुकटच्या जाहिरातबाजींमुळे असंख्य खिळे ठोकलेले वृक्ष जणू वेदनेने विव्हळत आहेत. यावर आळा घालून असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

बॅनर-पोस्टर घट्ट बसावा, यासाठी झाडांना चारही बाजूंनी खिळे ठोकले जातात. काही महाभाग तर पत्र्यावर जाहिरात करून पत्राच झाडाला ठोकतात. झाडावर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात. तो गंज वृक्षाच्या बुंध्यांत उतरतात. परिणामी वृक्ष कालांतराने खंगत जाते. झाडांवरील फ्लेक्स, बोर्डामुळे झाडांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. खिळे ठोकल्याने या झाडांना होणाऱ्या वेदनेची जाणीव प्रशासनाला कधी होणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

कठोर कारवाईची कायद्यात तरतूद
झाडांचे आयूष्य साधारणतः ५० ते १५० वर्षे आहे. मात्र, इजा पोहोचल्याने ते आयुष्य २० ते ५० वर्षे घटत असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात आले. शिवाय भारतीय संविधानात मानवाच्या जगण्याबरोबरच भारतातील सजीवसृष्टींचेही संवर्धन करण्याचे कायदे आहेत. वृक्षांवर खिळे ठोकणे, हे वृक्ष विद्रुपीकरण कायद्यांतर्गत येते. त्यानुसार संबंधित खिळे ठोकणाऱ्यांवर कठोर कारवाईची व दंडाची तरतूद आहे. महाराष्ट्र नागरीक्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम ८२१ अन्वये याविरोधात कारवाई होऊ शकते. झाडांना आधार देवून विद्युत रोषणाई, झाडांवर फोकस लावणे असे प्रकारही करण्यात येतात. या जाहिरातींमुळे झाडांच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com