मोबाईल लावताच येतो खोकल्याचा आवाज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

चिकन सेवन केल्यास कोरोनाची लागण होऊ शकते, असे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. त्यामुळे चिकन विक्रीचे प्रमाण झपाट्याने घसरले आहे. त्यामुळे चिकन विक्रेते अडचणीत सापडल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

नांदेड : कोरोना विषाणूचा सामान्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. आता त्यात भर पडली आहे मोबाईलवर ऐकू येणाऱ्या खोकल्याची. सात मार्चपासून कुठल्याही कंपनीच्या सीमवर काॅल केला असता उचलण्याआधी तब्बल ३३ सेकंदांचा कोरोना जनजागृती संदेश ऐकायला मिळतो आहे.

चीनपाठोपाठ आता भारतातही कोरोना संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण हे कोरोना बाधीत सापडत आहेत.  महाराष्ट्रात पुणे, नागपूर, यवतमाळ, मुंबई, ठाणे, नाशिकसह इतरही मोठ्या शहरांसह ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे.  काही अपवाद वगळता काही मोठ्या शहरांत रुग्ण नसल्याचे सांगितले जात असले तरी सात मार्चपासून मोबाईलच्या डायलर टोनवर कोरोनाचीच धून ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे सात मार्चपासून जवळपास सर्वच मोबाईलवर कोरोनाची धून वाजत आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरु आहे. साधी कुणाला सर्दी अथवा खोकला झाला तरी नागरिक हा कोरोनाचा संशयित म्हणून टिंगल उडवितात. आता तर काही तरुण या नावाचा अनेक गोष्टींसाठी वापर करून विनोद निर्माण करताना दिसत आहेत. लहान-मोठ्यांच्या तोंडात आज फक्त ‘कोरोना’ हाच शब्द दिसतो.

हेही वाचा - सहाय्यक फौजदाराचा कर्तव्यादरम्यान मृत्यू

आरोग्य विभागाकडून होतेय जनजागृती 
कुठल्याही ग्राहकाने समोरच्या व्यक्तीला फोन केला असता रिंग जाण्याआधी सुमारे ३३ सेकंदांची कोरोना डायलर टोन संपत नाही तोच सुरु होणारी ट्रिंग ट्रिंग सध्या अनेकांना अनुभवायला येत आहे. कोरोनाबाबत विविध माध्यमांतून झळकणाऱ्या बातम्यांमुळे परिसरातही भीतीची वातावरण पसरले आहे. मात्र हा आजार बाधा झालेला रुग्ण संपर्कात आल्याशिवाय होत नाही. इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडूनही प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे.

हे तुम्ही वाचलेच पाहिजे - इतिहासात दुसऱ्यांदा रेल्वेची धडधड थांबली, कशी? ते वाचलेच पाहिजे

मोबाईल कंपन्यांचाही जनजागृतीसाठी पुढाकार
हस्तांदोलन करू नये, हात वेळोवेळी स्वच्छ धुवावे, खोकला, सर्दी व तापाची लक्षणे आढळल्यास डाॅक्टरांशी संपर्क साधावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे यासारखे संदेश समाजमाध्यमांतून दिले जात आहेत. त्याचबरोबर काही अफवाही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत. त्यातील अफवांचा भाग वगळता स्वच्छता व सतर्कता बाळगणे हेच प्रत्येकासाठी अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे आव्हान परतवून लावण्यासाठी शासकीय स्तरावरून मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Sound of Cough Can be Brought on Mobile Nanded News