म्हणे पन्नास हजाराहून अधिक झाडे लावली; झाडे मरताहेत त्याचे काय, पर्यावरणप्रेमींचा संतप्त सवाल

Trees Cutting
Trees Cutting

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  सोलापूर ते उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतरावरील चौपदरीकरणाचे काम निकृष्ठ झाले आहे. डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी विविध ठिकाणच्या उड्डाणपुलाचे काम अर्थवटस्थितीत आहे. तरीही दोन तलमोड व फुलवाडीच्या टोल नाक्यावर वसूली सुरू झाली आहे. दरम्यान कामाचा ठेका घेतलेल्या एसटीपीएल कंपनीने काम सुरु करताना दहा हजाराहून अधिक वृक्षाची तोड केली. मात्र पुन्हा ती किती झाडे लावली.  लावली तर जगली किती, दुभाजकात लावलेल्या शोभेच्या झाडाची अवस्था काय झाली आहे हा संशोधनाचा विषय आहे.


सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी दहा हजार ७५७ तोडण्यात आल्याची माहिती दिली आहे. आजपर्यंत रस्त्याच्या बाजूने २३ हजार ६९० झाडे तर  रस्त्याच्या मध्यभागी ४२ हजार ५९२ झाडे लावण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे. वास्तविक  झाडांची कागदावरच्या नोंदी कदाचित खऱ्या असतील. मात्र प्रत्यक्षात लावलेल्या झाडांचे संगोपन झाले आहे का? रस्त्याच्या मध्यभागी किती ठिकाणी झाडाचा फुलोरा आकर्षिक करतो याचे चित्र पाहिले तर मोठी तफावत समोर आल्याशिवाय राहत नाही.

उमरगा भागात रस्त्याच्या बाजूने झाडे लावण्यात आली. मात्र त्याची देखरेख होऊ शकली नाही, झाडे वाळून गेली आहेत. सध्या नुसत्या वेळूच्या काठ्या मात्र ताठपणे उभ्या आहेत. दरम्यान महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू होण्याच्या पूर्वी वृक्षतोडीनंतर व्यापक वृक्ष लागवडीचा शब्द दिला होता. पिंपळ, वड, लिंब यासारखी पन्नास, साठ वर्षाची झाडे तोडण्यात आली. काम सुरु होऊन सहा वर्ष झाली आता तर टोलनाका सुरु होऊन आठ महिने झाले. तरीही झाडाचे वय वाढले नाही. वय वाढीसाठी त्याचे संगोपनच केले जात नसेल तर पर्यावरणाला पूरक झाडाची वाढ कशी होईल असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.



अर्धवट काम कधी पूर्ण होणार
सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत ८२.९५ टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण  असून अर्धवट स्थितीतील चौपदरीकरणाचे काम ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याची मुदत आहे.  चौपदरीकराचे डांबरीकरण झालेले असले तरी महामार्गावर अनेक ठिकाणी अडथळे कायम आहेत. काही ठिकाणी नव्याने झालेला रस्ता काम उखडल्याचा प्रकार दिसतो. आष्टामोड, मुरूम मोड, अणदूर, जकेकुर-चौरस्ता येथील उड्डाण पुलाचे काम खडलेले आहे. काही ठिकाणी काम सुरू असले तरी मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. धोकादायक ठिकाण असलेल्या बलसुर मोड येथे भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची मागणी पूर्ण झाली नाही. हॉटेल सोनाई व हॉटेल भागीरथी या दोन्ही ठिकाणी उमरग्याचा बाह्यवळण रस्ता सुरू होता तो धोकादायक बनला आहे. महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याने अपघात थांबले नाहीत.



चौपदरीकरणाच्या कामासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. मात्र नव्याने वृक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला जात नाही. पर्यावरणपूरक मोठी झाडे लावली जात नाहीत, शिवाय झाडे जगविण्यासाठी विशेष यंत्रणा, देखरेख महत्वाची असते. केवळ कागदोपत्री संख्यात्मक मेळ घालुन चालणार नाही तर त्यासाठी व्यापक दृष्टिकोन हवा.
- डॉ.उदय मोरे, पर्यावरणतज्ज्ञ

महामार्ग प्राधिकरण व एस.टी.पी. एल.कंपनीच्या दुर्लक्षामुळे चौपदरीकरणाचे काम निकृष्ठ झाले आहे. काम व्यवस्थित व सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण झालेले नसताना टोल वसुली सुरू आहे. वृक्ष लागवडीची कागदोपत्री माहिती आणि प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. चौपदरीकरणाचे अर्धवट काम आणि वृक्ष लागवडीचा देखावा याबाबत मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
- दिलीप जोशी, नागरिक

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com