ट्रकने दोन बैलगाड्यांना चिरडले

hingoli photo
hingoli photo

कळमनुरी (जि. हिंगोली) : धावत्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दोन बैलगाड्यांना चिरडल्याची घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आराटी फाटा परिसरात घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले असून एक बैल जागीच ठार झाला आहे.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तालुक्यातील साळवा येथील प्रतापराव विठ्ठलराव माखणे व कुंडलिक लक्ष्मणराव आवटे यांचे राज्य रस्त्यावर असलेल्या जनता ढाब्याच्या मागे शेती आहे. 

बैलगाडीतून घराकडे निघाले

शेतामधील पेरणी व इतर कामे आटोपून कुंडलिक आवटे बैलगाडी घेऊन साळवा गावी निघाले होते. त्यांच्यामागे प्रतापराव माखणे हेदेखील आपली पत्नी नीता माखणे (वय ३५) मुलगा शिवम माखणे (वय १४), मुलगी शिवानी माखणे (वय १५) बैलगाडीमधून निघाले होते. 

ट्रकचे टायर फुटले

या वेळी एकामागोमाग दोन्ही बैलगाड्या निघाल्या असताना आराटी पाटी परिसरात राज्य रस्त्याच्या बाजूने बैलगाड्या जात असताना नांदेडवरून हिंगोलीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकचे टायर फुटले. या वेळी झालेल्या आवाजामुळे समोर असलेल्या बैलगाडीचे बैल बुजाडल्या गेले. 

मदतीसाठी ग्रामस्थ धावले

दुसऱ्या बाजूला ट्रकचालकाचेही ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामध्ये दोन्ही बैलगाड्या ट्रकखाली चिरडल्या गेल्या. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने या प्रकाराची माहिती रुग्णालय व पोलिस प्रशासनाला दिली. 

पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी

पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, एस. जी. रोयलावार, कर्मचारी सुनील रिठे, गजानन गडदे, रवी बांगर, श्री. होडगीर, रामचंद्र जाधव, श्री. चाटसे यांच्यासह आखाडा बाळापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोचले. 

शिवम माखणे ट्रकखाली दबला

अपघातातील जखमी कुंडलिक लक्ष्‍मण आवटे, प्रतापराव माखणे, शिवानी माखणे, नीता माखणे यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी नांदेड येथे हलविले. ट्रकखाली दबलेल्या शिवम माखणे याला बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला. 

एका बैलाचा जागीच मृत्यू

तसेच मोहन माखणे, देविदास माखणे यांच्यासह ग्रामस्थांची मदत घेत पोलिसांनी जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकखाली अडकलेल्या शिवमला बाहेर काढण्यात आले. या अपघातात शिवम माखणे हा गंभीर जखमी झाला आहे, तर एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. अपघातातील जखमींना नांदेड येथे हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com