
उदगीर तालुक्यात सध्या सगळीकडे ऊस लागवड जोमात आहे. शेतकरी लागवडीसाठी धावपळ करत असताना दुसरीकडे बारा-बारा वेळेस शेतीचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
उदगीर (जि.लातूर) : उदगीर तालुक्यात सध्या सगळीकडे ऊस लागवड जोमात आहे. शेतकरी लागवडीसाठी धावपळ करत असताना दुसरीकडे बारा-बारा वेळेस शेतीचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या बाबत संबंधित अधिकारी अनभिज्ञ असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. तालुक्यात या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाले आहे. बहुतांशी प्रकल्प पूर्ण भरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पारंपरिक पिकांऐवजी ऊस लागवडीकडे वळले आहेत. उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने विजेची मोठी अडचण शेतकऱ्यांना निर्माण होत आहे. दिवस पाळी असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. देवर्जन (ता. उदगीर) येथील ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या गुरधाळ कृषी फिडरवर शनिवारी (ता.पाच) सकाळी पावणे नऊ ते सायंकाळी पावणेपाच या नऊ तासात तब्बल बारा वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. याबाबत संबंधित लोहारा युनिट कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अनभिज्ञ असून ३३ केव्ही उपकेंद्रातील विद्युत ऑपरेटर वरच उपकेंद्र चालत असल्याची स्थिती आहे. याबाबत लोहारा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता परात तुरकुडे यांच्याशी संपर्क साधला असता लाईनवर काम करण्यासाठी बंद करून द्यावे लागते. विद्युत पुरवठा खंडित किती वेळ झाला याबाबतची माहिती घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपकेंद्रात नोंदवहीत नाही
शनिवारी नऊ तासांत तब्बल बारा वेळेस विद्युत पुरवठा खंडित होऊनही त्याची अधिकृत नोंद ३३ केव्ही उपकेंद्रातील नोंदवहीत घेण्यात आली नाही. विद्युत पुरवठा खंडित झाला तरी व सुरू झाला. त्यावेळी त्याची वेळ टाकुन उपकेंद्रातील नोंदवहीत नोद घेणे बंधनकारक असतानाही येथील उपकेंद्रात नोंद घेतली गेली नसल्याने वरिष्ठ विभागाचे या उपकेंद्रा कडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
संपादन - गणेश पिटेकर