लग्न सोहळा आटोपून कल्याणला जाणारी मिनी बस नगर-बीड मार्गावर पलटी, वीस वऱ्हाडी जखमी

निसार शेख
Monday, 18 January 2021

लग्न समारंभ उरकून परत भरधाव वेगाने कल्याण येथे जात असताना चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटून कडा हद्दीतील हॉटेल ग्रीनपार्क समोरील पुलाला धडकून पलटी झाली.

कडा (जि.बीड) : आष्टी तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर-बीड राज्यमार्गावरील कडा हद्दीतील हॉटेल ग्रीनपार्क समोरील पुलाला भरधाव वेगाने येणारी मिनीबस धडकून पलटी होऊन झालेल्या अपघातात सुमारे अठरा ते वीस वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.१८) रात्री आठ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली आहे. कल्याण येथून बावदान ट्रॅव्हल्स कंपनीची (एमएच ०५ डीके ६१२५)  मिनीबसने पिंपळगाव जामखेड (जि.अहमदनगर) येथे दुपारी लग्न समारंभ उरकून परत भरधाव वेगाने कल्याण येथे जात असताना चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटून कडा हद्दीतील हॉटेल ग्रीनपार्क समोरील पुलाला धडकून पलटी झाली.

या मिनी बसमध्ये वीस जण वऱ्हाडी प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये श्रवण बनसोडे, विघ्नेश बनसोडे, कवू कांबळे, महेर बनसोडे, चंची बनसोडे, राजाबाई डाडर, सुनील पवार, धोंडूबाई जाधव, विराज जाधव, चालक कनिराम राठोड यांच्यासह वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरील मिनी बस अहमदनगर-बीड महामार्गावर आडवी झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. 

जखमींना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर गंभीर जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तसेच कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, जयेश कदम, बंटी गायकवाड यांच्यासह या मार्गाने प्रवास करणाऱ्या काही व्यक्तींनी जखमींना मदत केली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty People Injured In Accident Kada Beed Accident News