प्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा

विकास गाढवे
Saturday, 31 October 2020

अंबाजोगाईला जाणाऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात छडा लावला.

लातूर  : अंबाजोगाईला जाणाऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात छडा लावला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून प्रवाशाच्या मोबाईलसह रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. हाश्मी अकरमअली मुकरमअली (वय २८, रा. सदरबाजार, अंबाजोगाई) हा प्रवाशी येथून अंबाजोगाईला जाण्यासाठी गुरूवारी (ता. २९) रात्री साडेआठ वाजता नवीन रेणापूर नाका येथे थांबला होता.

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

त्या वेळी अंबाजोगाईला जात असलेल्या वाहनाला त्यांनी हात दाखवला. चालकाने त्याला मधल्या सीटवर बसवले. वाहनात पूर्वीचे तिघेजण होते. काही अंतर गेल्यानंतर तीघांनी त्याला चाकूचा धाक दाखवत, आठशे रूपये दोन मोबाईल, दोन एटीएम कार्ड व अन्य साहित्य असा २५ हजार आठशे रुपयाचा ऐवज लुटला. प्रवाशाने पिंपळफाट्यानजीक वाहनातून उडी मारली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारचा गुन्हा बुधवारीही (ता. २८) घडला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी (ता. ३०) रात्री तुळजापूर टी पाँईटवर संशयित पकडले. पथकाने वाहन थांबवून चालक विशाल राजेंद्र मिश्रा (वय ३५, रा. कादरीनगर, औसा) याची चौकशी केली.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

मोबाईलवरुन छडा लागला

वाहनाच्या झडतीत अंबाजोगाईला जाणाऱ्या प्रवाशाकडून लुटलेला मोबाईल सापडला. त्यानंतर मिश्रा याने गुन्ह्याची कबुली देत तीन साथीदारांचे नावे सांगितले. पोलिसांनी रात्री उशिरा साथीदारांपैकी अजिंक्य मुळे याला नंदीस्टॉप परिसरातून अटक केली. तर विश्वजीत देवकत्ते व नितीन भालके हे दोघे फरार झाले. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव, उपनिरीक्षक एल. जी. कोमवाड, जमादार अंगद कोतवाड, संजय भोसले, राजू सूर्यवंशी, राम ढगे, वहिद शेख, राम गवारे, युसूफ शेख, रामहरी भोसले, सदानंद योगी, नामदेव पाटील, अभिमन्यू सोनटक्के, राजेश कंचे, सचिन धारेकर, प्रदीप चोपणे, श्री. खडके व सचिन मुंडे यांचा समावेश होता.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Arrested In Case Of Looting Passengers Latur News