जालन्यात विलगीकरण कक्षात दोन रुग्ण नव्याने दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या चार रुग्णांपैकी दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, रविवारी (ता. २९) विलगीकरण कक्षात दोन रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. 

जालना - जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या चार रुग्णांपैकी दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, रविवारी (ता. २९) विलगीकरण कक्षात दोन रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. 

जिल्ह्यात रविवारपर्यंत ७८ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी ७६ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी ७१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून सुटी मिळालेल्या व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. रविवारपर्यंत एकूण ११० परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी १०८ व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. इतर शहरे व राज्यांतून आलेल्या ४ हजार ७८८ व्यक्तींची तपासणी करून त्यांचेही घरीच अलगीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. 

औरंगाबादहून आलेले चौघे होम क्वारंटाइन 

बदनापूर  तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात पुणे - मुंबई व इतर जिल्ह्यांतून आलेल्या लोकांना १४ दिवस अलगीकरण कक्ष अथवा होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तालुक्यात सद्यःपरिस्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या विलगीकरण विभागात एकही रुग्ण नाही तर आतापर्यंत तालुक्यात जवळपास साडेपाचशे लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

दरम्यान, औरंगाबादहून आपल्या मूळगावी बदनापूर येथे आलेल्या दोन महिला व दोन पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय वसतिगृहातील अलगीकरण कक्षात दाखल करण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओम ढाकणे यांनी केली होती. मात्र त्या चौघासह त्यांच्या नातेवाइकांनी विनंती करून हमी घेतल्याने त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या चौघा जणांमध्ये कोरोनाच्या संदर्भात कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two patients admitted in isolation ward