अंगणात खेळणाऱ्या दोन चिमुकल्या बहिणींना कंटेनरने चिरडले, जालना जिल्ह्यातील धक्कादायक घटना

उमेश वाघमारे
Wednesday, 9 December 2020

जालना-सिंदखेडराजा मार्गावरील जालना तालुक्यातील नाव्हा शिवारातील रस्त्या लगत असलेल्या घराच्या अंगणामध्ये कंटेनर घुसल्याने अंगणात खेळत असणाऱ्या दोन चिमुकल्या बहिणी जागीच ठार झाल्या आहेत.

जालना : जालना-सिंदखेडराजा मार्गावरील जालना तालुक्यातील नाव्हा शिवारातील रस्त्या लगत असलेल्या घराच्या अंगणामध्ये कंटेनर घुसल्याने अंगणात खेळत असणाऱ्या दोन चिमुकल्या बहिणी जागीच ठार झाल्या आहेत. सुमया सलिम शेख (वय १०), शाहिन सलिम शेख (वय ६, रा.धारकल्याण) असे या मुलींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता.नऊ) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. सिंदखेडराजा येथून जालन्याकडे एक कंटेनर बुधवारी दुपारी भरधाव वेगाने येत होते. जालना तालुक्यातील नाव्हा शिवारात हे कंटेनर आल्यानंतर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला.

त्यामुळे रस्त्या लगत असलेल्या कासम शेख यांच्या घराचे कंपाऊंड तोडून हे कंटेनर घराच्या अंगणामध्ये घुसले. त्यामुळे अंगणात खेळणाऱ्या कासम शेख यांच्या दोन नाती या कंटेरखाली चिरडल्या गेल्याने त्या जागीच ठार झाल्या आहेत. सुमया सलिम शेख (वय दहा), शाहिन सलिम शेख असे मृत बहिणींचे नावे आहेत. तसेच घराचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका जालना पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तालुका जालना पोलिसांनी हे कंटेनर ताब्यात घेतले असून दोन्ही मृत मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले आहेत. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Sisters Died In Container Accident Jalna News