बीड जिल्ह्यात दोन हजार पीपीई किट उपलब्ध होणार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

आरोग्य यंत्रणेत कोरोनाला रोखणाऱ्या पीपीई किटचा तुटवडा होता. सद्यःस्थितीत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे असे केवळ ५० पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) उपलब्ध आहेत.

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची उत्तम अंमलबजावणी सुरू असली तरी डॉक्टरांसाठी व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) किटची मागणी होत होती. मंगळवारपर्यंत (ता. ३१) जिल्ह्यात अशा दोन हजार किट उपलब्ध होणार आहेत. सद्यःस्थितीत आरोग्य विभागाकडे ५० किट आहेत.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीवरील नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हा अव्वल ठरला आहे. अद्याप जिल्ह्यात कोरोना रुग्णही आढळला नाही. मात्र, आरोग्य यंत्रणेत कोरोनाला रोखणाऱ्या पीपीई किटचा तुटवडा होता. सद्यःस्थितीत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे असे केवळ ५० पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) उपलब्ध आहेत.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

राज्यभरातून मागणी वाढल्याने पुरवठा होत नव्हता. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या डॉक्टर आणि संबंधित मंडळींचाही जीव टांगणीला लागला होता. दरम्यान, मंगळवारपर्यंत जिल्ह्यात असे दोन हजार किट उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. त्यामुळे शासकीय डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा - परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

कोरोना विषाणूचा भविष्यात फैलाव झालाच तर आवश्यक बाब म्हणून नवीन ५० व्हेंटिलेटर जिल्ह्याला उपलब्ध होणार आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेत केवळ बीडच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वारातीमध्येच आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. 

‘त्या’ डॉक्टरांनाही किटची गरज 
जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक कॅज्युल्टी, ओपीडीमधील डॉक्टरांना या किटची गरज आहे. कारण, तपासणीसाठी येणारे रुग्ण कुठून आले याची माहिती नसते. भविष्यातील धोका ओळखून किटचे तसे नियोजन होणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand PPE kits will be available in Beed district