रसायनमिश्रित ताडी बनविण्याचे प्रकार वाढले

spurious-liquor.jpg
spurious-liquor.jpg


बिलोली, (जि.नांदेड) ः जिल्हाभरात संचारबंदी लागू केलेली असतानाही बिलोली तालुक्यातील सावळीसह तेलंगणा सीमेलगत असलेल्या काही गावांत रसायनमिश्रित ताडी तयार करून विक्री केली जात असल्याने अनेकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांना व्यसन जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउनचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवाय नांदेड जिल्ह्यामध्ये संचारबंदी कायदा लागू झाला आहे. लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. शहरी व ग्रामीण भागात आरोग्य विभागासह नगरपालिका ग्रामपंचायतींकडून स्वच्छता मोहीम राबविली जात असून गावातील प्रत्येक वार्डात तसेच शहरी भागातील प्रभागात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला विक्री केंद्र, फळविक्री याशिवाय अन्य कुठलीही दुकाने सध्या सुरू नाहीत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात गर्दी नियंत्रणात आली आहे.


स्थलांतरीत झालेला वर्ग सध्या गावाकडे 
लॉकडाउनमुळे काही प्रमाणात गैरसोय निर्माण होत असल्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यासारखा दुसरा उपाय नसल्याचीही चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चिली जात आहे. मात्र, लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात व्यसनाधीनता वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कामानिमित्त विविध व्यवसायांसाठी स्थलांतरीत झालेला वर्ग सध्या गावाकडे परतला आहे. घराबाहेर पडायचे नसल्यामुळे ग्रामीण भागात अवैध धंद्यांना ऊत येत आहे.


वरिष्ठांकडे संपर्क
तालुक्यातील सावळी येथे मागील आठ ते दहा दिवसांपासून खुलेआम रसायनमिश्रित ताडी तयार केली जात आहे. सध्या पाच ते सहा ठिकाणी अशी बनावट ताडी करून परिसरातील काही गावांत विक्री केली जात आहे. लॉकडाउनमुळे शहरी भागात कडकडीत बंद असला तरीही सावळी व परिसरात सायंकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे. यासंबंधी काही जागरूक नागरिकांनी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांकडे संपर्क साधला आहे.


अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी 
बिलोली तालुक्यात शहरी भागात वास्तव्यास असलेले अनेक जण आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पूर्वीपासूनच कोरोनासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ग्रामीण भागात व शहरी भागात शाळांना सुट्या असून लहान मुले मोकळी फिरताहेत. या ताडी विक्रीचा त्यांच्या भावी वाटचालीवर व आरोग्यावर विपरित परिणाम होणार आहे. रसायनमिश्रित ताडीचा मानवी शरीरावर गंभीर परिणाम होत असतो, तसेच रसायनमिश्रित ताडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे. मागील आठवड्यात बिलोली पोलिसांनी अवैध देशी दारू पकडून आरोपीविरुद्ध कारवाई केली असली तरीही सीमावर्ती भागात व तालुक्यातील काही गावात रसायनमिश्रित ताडीची सर्रासपणे विक्री होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com