तहसीलदाराच्या खात्यात अतिवृष्टीचे २२ कोटी ८७ लाख

युवराज धोतरे 
Wednesday, 11 November 2020

अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी सत्त्याऐंशी लाखाचा निधी प्राप्त : उदगीरचे तहसीलदार गोरे यांची माहिती. 

उदगीर (लातूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रति हेक्‍टरी दहा हजार रुपये मदतीच्या पॅकेजचा पहिला हप्ता २२ कोटी ८७ लाख रुपये तहसील कार्यालयास प्राप्त झाले असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परतीच्या पावसाने सतत दोन वेळा उदगीर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सादर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. यावर्षी उदगीर तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन ४५ हजार ६५५ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण ५२ हजार ४३६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 
शासनाने जाहीर केलेल्या प्रति हेक्टरी १० हजार प्रमाणे एकूण क्षेत्र व शेतकरी संख्येनुसार ४१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पहिला टप्पा २२ कोटी ८७ लाखाचा निधी येथील तहसील कार्यालयात वर्ग केला आहे. या पहिल्या टप्प्याच्या निधीचे वाटप लागलीच होणार असून अबकड या क्रमानुसार तालुक्यातील जवळपास साठ गावांना वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणारा निधी नुसार उर्वरित गावांना ही नुकसानीची मदत देण्यात येणार असल्याचेही तहसीलदार श्री गोरे यांनी यावेळी सांगितले. ही मदत प्रति हेक्टरी १० हजार जास्तीत जास्त दोन हेक्‍टरपर्यंत कोरडवाहू व जिरायती साठी तर प्रति हेक्टरी २५ हजार रूपये दोन हेक्टर पर्यंत बागायती क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या शासनाच्या मदतीमुळे तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील जवळपास ६०( गावातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदी वातावरण दिसून येत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgir tehsil account received 22 crore 87 lakh