घोषणा दहाची, मागणी सातच हजाराची, उदगीर तहसीलदाराचा कारभार, नऊ कोटींचा फटका

युवराज धोतरे 
Thursday, 29 October 2020

उदगीर तहसीलदारांनी मागितले ६८०० प्रमाणे पैसे.  .  

उदगीर (लातूर) : परतीच्या पावसाने सतत दोन वेळा उदगीर तालूक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सादर करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टरी १० हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र येथील तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपये अनुदानाची मागणी केली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यावर्षी उदगीर तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने अतिवृष्टी होऊन ४५ हजार ६५५  हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण ५२ हजार ४३६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. प्रति हेक्‍टरी ६८०० प्रमाणे एकूण ३१ कोटी ४५ लाख सात हजार चारशे रुपये अनुदानाची मागणी महसूल विभागाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शासनाने जाहीर केलेल्या प्रति हेक्टरी १० हजार प्रमाणे एकूण क्षेत्र व शेतकरी संख्येनुसार ४० कोटी ३६ लाख रुपयांच वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र तहसील कार्यालयाने फक्त ३१ कोटी ४५ लाख सात हजार ४०० रुपयांची मागणी केली असल्याने नऊ कोटी २१ लाख रुपये रकमेचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे परत सुधारित प्रस्ताव पाठवणे अपेक्षित आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळू शकणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उदगीर तालुक्यातील आठ महसूल मंडळात आठ ते पंधरा दिवसांच्या फरकाने दोन वेळा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे उडीद, सोयाबीन, ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुद्धा झाले आहेत. याचा रीतसर अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. मात्र अनुदान मागणी व शासनाने जाहीर केलेल्या रकमेत तफावत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे दिसून येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना शासनाने जाहीर केलेले अनुदान केव्हा मिळणार? या आशेवर बसलेले शेतकरी एकीकडे तर शासनाने जाहीर केलेल्या दहा हजाराचे अनुदान मिळणार की ६८०० प्रमाणे महसूल कार्यालयाने मागणी केलेले अनुदान मिळणार? असा नवीन पेच आता निर्माण झाला आहे. शासनाने जाहीर केलेली प्रति हेक्‍टरी दहा हजार रुपये प्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी महसुल विभागाने प्रयत्न करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यमंत्री बनसोडे यांनी पुढाकार घ्यावा
राज्य शासनाने जाहीर केलेली प्रति हेक्‍टरी दहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुढाकार घेऊन येथील महसूल कार्यालयाने ६८०० प्रमाणे केलेली मागणी कोणत्या आधारे केली आहे याची चौकशी करून दहा हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgir tehsildar obstruction drought grant ten thousand declarations while only seven thousand demand