उदगीरची वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर; कोंडीबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी

udgir traffic
udgir traffic

उदगीर (जि.लातूर) : लातूर शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यात येत आहे. मात्र दिवसेंदिवस उदगीर शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडत चालली आहे. शहरातील मुख्य रत्यावरून नागरिकांना चालत जाणे अवघड बनले आहे. उदगीरच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी उदगीरकरांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील नांदेड-बिदर या मुख्य रस्त्यासह देगलूर रोड परिसरील रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या रस्त्यावर थांबणारे हातगाडे, ऑटो रिक्षा, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व बेशिस्त दुचाकीची पार्किंग यामुळे नागरिकांना चालणे कठीण बनले आहे. अनेक वेळा शहरातील नागरिकांनी नगरपालिका, पोलीस प्रशासन व महसूल विभागाला निवेदने देऊनही रस्ते खुले होत नाहीत त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

शहरातील रस्त्यावर थांबणाऱ्या हातगाड्यांना नगरपालिकेने जागा देणे, रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या ऑटोरिक्षा यांना पार्किंगची व्यवस्था करणे व दुचाकी, चारचाकी या वाहनांना पार्किंगसाठी जागा देऊन या रस्त्यावरचे अडथळे दूर करण्याची कार्यवाही करण्यास कोणीही पुढाकार घेत नसल्याने शिवाजी चौक ते शाहू चौक दरम्यानच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर हातगाडे, ऑटोरिक्षा व अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने आणि दुचाकीची पार्किंग होत आहे त्यामुळे वाहतुकीची तासन तास कोंडी निर्माण होत आहे. 

दिवसेंदिवस या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. रस्ते तेच अन वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर भर पडत असल्याने रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर अडथळे निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. मुख्य रस्त्याला पर्यायी असलेल्या रस्त्यावरही अनेक अडथळे असल्याने तिथूनही नागरिकांना चालत जाणे कठीण झाले आहे. या वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत.

काही रस्ते वन-वे करावे लागणार आहेत. काही मार्ग बदलावे लागणार आहेत. अखंडित रस्ते दुभाजक उभारावे लागणार आहेत. शिवाय ऑटोरिक्षा हात गाड्यांना जागे देऊन त्यांचे अतिक्रमण काढावे लागणार आहेत. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूरच्या धर्तीवर उदगीर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून दिल्यास या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे परिणामी वाहतुकीची कोंडीची समस्या मिटणार आहे.

अतिक्रमणे हटवले शिवाय वाहतुकीचा प्रश्न मिटणार नाही-
याबाबत राज्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे कायमची हटवल्या शिवाय वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही. शिवाय नळेगाव रोड वळण रस्त्यावरील मलकापूर गावाजवळील उड्डाणपुलाचे काम झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या प्रश्नाबाबत काय करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

पायाभूत सुविधेशिवाय वाहतुकीचा प्रश्न सोडवणे अशक्य
लातूरच्या धर्तीवर उदगीर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गेल्या महिन्यात उदगीर येथे आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषदेत सांगितले होते की नगरपालिका विद्युत वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम खाते या सर्वांनी यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. शिवाय काही पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील त्याशिवाय शहरातील वाहतुकीचा प्रश्न निघणे शक्य होणार नाही.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com