दाळींबमध्ये महाविकास आघाडीला धक्का! नाईचाकूरात पती-पत्नी विजयी

अविनाश काळे
Monday, 18 January 2021

नाईचाकूरात तेरापैकी शिवसेना व काँग्रेसच्या दहा जागा निवडून आल्या.

उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यातील ४९  ग्रामपंचायतीपेकी अकरा बिनविरोध निवडून आल्याने ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे सोमवारी (ता.१८) सकाळी बारापर्यंत सर्वच निकाल लागले. राष्ट्रीय महामार्गावरील दाळींब ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारत सामाजिक कार्यात सक्रिय रहाणारे बाबा जाफरी यांच्या पॅनेलने विजयाची बाजी मारली.

शहरातील अंतु बळी सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी सकाळी आठ वाजता सोळा टेबलवर निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणूकीचे अनेक निकाल धक्कादायक लागले आहेत. गुंजोटीत उमरगा बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा पैकी शिवसेनेच्या बारा जागा निवडून आल्या तर काँग्रेस दोन, माजी सैनिक, भाजपा व अपक्ष प्रत्येकी एक जागा निवडून आली आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी पॅनेलला या वेळी मतदारांनी धक्का दिला.

SBI चा 'गजब' कारभार! तब्बल 54 हजार रुपये खात्यादाराच्या परस्पर बिहार सरकारच्या खात्यावर

नाईचाकूरात तेरापैकी शिवसेना व काँग्रेसच्या दहा जागा निवडून आल्या. बंडखोर शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. सावळसूरात बाळू माशाळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सात जागा निवडून आल्या. जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे यांच्या कुन्हाळी गावाने गड राखला. तलमोड ग्रामपंचायतीत जिल्हा काँग्रेसचे सचिव अश्लेष मोरे यांच्या पॅनेलने बहुमत प्राप्त केले.

तुरोरीत संमिश्र जागा मिळाल्या. शिवसेना व भाजपाच्या आघाडीला आठ, व्यापारी महासंघाच्या आघाडीला दोन तर अपक्ष व काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. मूरळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच शमशोद्दिन जमादार यांच्या पॅनेलने पुन्हा बाजी मारली. कडदोऱ्यात युवकांच्या आघाडीला बहुमत मिळाले. उमरगा पंचायत समितीचे सभापती सचीन पाटील यांनी गुगळगाव ग्रामपंचायतीत बहुमत मिळवले.

नळदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी सज्ज;दीर्घ प्रतीक्षेनंतर किल्ला खुला

दाळींबमध्ये महा विकास आघाडीला धक्का-
दाळींबमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश वाले यांनी पुढाकार घेऊन महा विकास आघाडीचे पॅनेल निवडणूकीत उतरले होते. मात्र बाबा जाफरी मित्रमंडळाच्या यांच्या पॅनेलने सतरापैकी पंधरा जागा जिंकुन विजयाची बाजी मारली. 

नाईचाकूरात पती - पत्नीचा विजय-
नाईचाकूरात दोन वेगवेगळ्या प्रभागातुन निवडणूक लढविलेल्या बी.के. पवार व त्यांच्या पत्नी उषाबाई निवडून आल्या आहेत. दोघांनी विजयाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान भगतवाडी, कदेर येथील दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले.

बोरी ग्रामपंचायतीत पुन्हा मदनेंची बाजी !
गत पंचवार्षिक निवडणूकीत बोरी ग्रामपंचायत बिनविरोध आली होती, यावेळीही बिनविरोधचा प्रयत्न झाला. तीन जागा बिनविरोध काढण्यात आल्या मात्र समन्वयाअभावि चार जागेची निवडणूक लागली. मानसिंग मदने स्वतः विजयी होत चारही जागा निवडून आणल्या. कारमधून त्यांनी विजयी मिरवणूक काढली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: umarga gram panchayat election result usmanabad political news