डोक्यात फावडे घालून चुलत्याने केली पुतण्याची हत्या, शेतीच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल 

दीपक सोळंके
Sunday, 10 January 2021

पोलिसांनी संशयित चुलत्याला व इतर दोघांना ताब्यात घेतले आहे.

भोकरदन (जि.जालना) : शेतीच्या वादातून उद्भवलेल्या चुलत्या पुतण्याच्या भांडणात चुलत्याने रागाच्या भरात पुतण्याच्या डोक्यात फावडे मारल्याने गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचा शनिवारी (ता.नऊ) रात्री उशिरा उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित चुलत्याला व इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील  कोळेगाव येथील कौतिकराव आनंदा गावंडे (वय ३७ ) व त्यांचे चुलते सुखदेव सारजूबा गावंडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या कारणाहून वाद सुरू होते.

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप

शनिवारी (ता.नऊ) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कौतिक गावंडे हे शेतात चरी भरत असतांना चुलते सुखदेव सारजूबा गावंडे व चुलत भाऊ सुधाकर गावंडे आणि परमेश्वर गावंडे तेथे आले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली व वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात संशयित आरोपी सुखदेव गावंडे यांनी कौतिक गावंडे यांच्या डोक्यात फावड्याने वार केला व इतर दोघांनी खाली पाडून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत कौतिक गावंडे गंभीर जखमी झाले. या जखमी अवस्थेत त्यांनी स्वतः दुचाकी चालवत भोकरदन पोलीस ठाणे गाठले.

माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला, अल्पवयीन मुलीची पोलिसांकडे तक्रार

पोलिसांना त्यांना तत्काळ उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिल्लोड येथे हलविण्यात आले. सिल्लोड येथे उपचार घेऊन ते पुन्हा भोकरदन ठाण्यात आले व वर नमूद घटनेची तक्रार पोलीसांना दिली. यानंतर कौतिक गावंडे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात घेऊन जात असतांना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रस्त्यातच त्यांचा मृत्यु झाला. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

दरम्यान या घटनेतील फिर्यादीचा मृत्यु झाल्याचे कळताच भोकरदन पोलीसांनी रात्रीतूनच तपास चक्रे फिरवून संशयित आरोपी चुलते सुखदेव सारजूबा गावंडे, चुलत भाऊ सुधाकर सुखदेव गावंडे आणि परमेश्वर देवराव गावंडे यांना ताब्यात घेतले. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस हेडकाँस्टेबल सूर्यकांत केंद्रे, पोलीस कर्मचारी रुस्तुम जैवळ, अभिजित वायकोस, राहुल घुले यांनी केली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle Murdered Nephew In Bokardan Jalna Crime News