दिल्लीतून आलेले तिघेजण वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली माहिती

परभणी : दिल्ली येथे तबलिकी जमातमध्ये परभणीतील तीन नागरिक सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या तिघांचा शोध घेतला असून त्या तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात निगराणीमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळात मोठ्या प्रमाणात लोक जमल्याची बाब दिल्ली सरकारने उघड केली. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या ठिकाणी जमलेल्या हजारो लोकांपैकी अनेकांना कोरोनाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. काही जण तर कोरोना विषाणुच्या संसर्गात आल्याचे ही उघड झाले आहे. या तबलिकी जमातीमध्ये परभणीतील तिघे असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मिळाली होती. हे तिघेही १३ मार्च रोजीच परभणीत आले होते.

हेही वाचा - आता मार नाही... थेट कारवाईच..!

शोध घेण्याचे राज्यशासनाने दिले आदेश
 दिल्लीतील तबलिकी जमातीतून आलेल्या लोकांचा शोध घ्यावा, असे आदेश राज्यशासनाने जिल्हाधिकारी परभणी यांना दिले होते. त्यानुसार त्यांचा मंगळवारी (ता.३१) शोध घेण्यात आला. त्या तिघांचा शोध घेवून त्यांना मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. दरम्यान, जे लोक बाहेर देशातून किंवा बाहेर राज्यातून आले अश्या लोकांनी प्रशासनास माहिती द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. परंतू या तिघांनीही सदरील माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगतीले.

हेही वाचा - अवकाळीचा वाढला मुक्काम; पाच दिवस धोक्याचे !

हेही वाचा...

पेंशन बचाव कृती समिती देणार एक दिवसाचे वेतन

परभणी : कोअर कमिटी शिक्षण संघर्ष संघटना मुंबई यांच्या झालेल्या निर्णयानुसार जुनी पेंशन बचाव कृती समिती परभणी ता. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. राज्यात २००५ नंतर नियुक्त झालेले २० ते २२ हजार कर्मचारी असून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जुनी पेंशन बचाव कृती समितीने सुद्धा आपले एक दिवसाचे वेतन कपात करून घेण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत. कोरोना विषाणूमुळे राज्यात परिस्थिती गंभीर झाली असता आपत्तीवर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक दिवसाचे वेतन देण्यासाठी पेंशन बचाव कृती समितीचे अध्यक्ष अशोक रसाळ, सचिव विजय गारकर, निरज पौळ, राजकुमार धबडे, अब्दुल वाजेद, अभिजित धानोरकर, वाया. आर. पाते, सचिन कदम, बाळासाहेब कदम, हरिश्वर पाटील, श्रीमती कुंभेकर, प्रा. वसंत लोंखडे, शे. नजीर, शांतीलिंग काळे, विनायक कदम, संतोष देशमुख, रामप्रसाद अवचार आदींनी निर्णय घेतला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the supervision of three medical experts from Delhi,parbhani news