बीड जिल्ह्यात लोक घरात अन् कडक उन्हात ती रणरागिणी वीजखांबावर 

निसार शेख 
Friday, 15 May 2020

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता महावितरणही मागे राहिले नाही. मागील दोन महिन्यांपासून सर्वच घरांत बसून आहेत. उन्हाळ्याचे दिवस, त्यात बीड जिल्ह्याचे तापमान ४० च्या पुढे. घरात थांबायचे म्हटल्या‌वर वीज तर हवीच ना! अशा परिस्थितीत ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्याचे काम सध्या आष्टीच्या महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या उषा जगदाळे ही रणरागिणी पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कार्य करीत आहे. 

कडा (जि. बीड) - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महसूल, पोलिस, वैद्यकीय, शिक्षण विभागाने कंबर कसली असून बीड जिल्ह्यामध्ये एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. परंतु या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता महावितरणही मागे राहिले नाही. मागील दोन महिन्यांपासून सर्वच घरांत बसून आहेत. उन्हाळ्याचे दिवस, त्यात बीड जिल्ह्याचे तापमान ४० च्या पुढे.

घरात थांबायचे म्हटल्या‌वर वीज तर हवीच ना! अशा परिस्थितीत ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्याचे काम सध्या आष्टीच्या महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या उषा जगदाळे ही रणरागिणी पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कार्य करीत आहे. आष्टी तालुक्यातील देवीगव्हाण येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उषा जगदाळेला २०१३ मध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कडा येथे नियुक्ती मिळाली. साडेसहा वर्षे कडा येथे ड्युटी करून मागील वर्षी वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून पदोन्नती मिळून आष्टी येथे बदली झाली. घर, शेती तसेच दोन्ही मुलांचा अभ्यास घेऊन वेळेवरच ड्युटीवर हजर व्हायचे. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन आहे. यामुळे उद्‍भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत दिवसरात्र कार्यरत असणारे प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर सर्वच कोरोनाच्या धास्तीने घरात बसून आहेत. तर दुसऱ्या बाजूला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कर्मचारी अथक परिश्रम घेताना दिसत आहेत. गावाला सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ उषा जगदाळे या आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात एकही दिवस सुटी न घेता अविरत फिल्डवर आहेत.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान    

एरव्ही वीज गायब झाली की महावितरण कंपनीच्या नावाने खडे फोडणारे; मात्र सध्याच्या लॉकडाउनमध्येही एक महिला कर्मचारी कौटुंबिक जबाबदारी पार पाडून कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत आहे. कोरोनाच्या युद्धात लढणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलिस, महसूल विभाग असो की, स्वच्छता कामगार यांच्याप्रमाणे स्वत:चा जीव धोक्यात घालून ही रणरागिणी कठीण परिस्थितीत इतरांच्या बरोबरीने उन्हातान्हात लढून सर्वसामान्य जनतेला चोवीस तास नियमितपणे वीजपुरवठा पुरविण्याचे उत्कृष्ट काम उषा जगदाळे करत असल्याने या रणरागिणीची चर्चा सध्या आष्टी तालुक्यात होत आहे. 

 

वीज महावितरणसारख्या जोखमीच्या क्षेत्रात काम करीत असले तरी आमचीही सामाजिक बांधिलकी ठरते. आम्ही कौटुंबिक जबाबदारी पार पाडून हेच राष्ट्रीय कर्तव्य समजून ग्राहकांना अखंडित सुरळीत वीजपुरवठा देण्याचे कार्य करीत आहोत. 
- उषा जगदाळे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Usha Jagdale on power pole in Beed district