हिंगोलीत पाच दिवसांनंतर भरला भाजीपाला बाजार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

हिंगोलीत पाच दिवसांनी शुक्रवारी (ता. दहा) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात पालिका प्रशासनातर्फे ठरवून दिलेल्या पाच ठिकाणी बाजार भरला होता. औंढा नागनाथ, आखाडा बाळापूर येथे सोशल डिस्टन्सचा प्रयोग राबविण्यात आला. वसमतमध्ये खरेदीसाठी नागरिकांची धावपळ झाल्याचे दिसून आले.

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू असल्याने दिवसाआड भरणारा बाजार बंद करण्यात आला होता. त्यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी (ता. दहा) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात पालिका प्रशासनातर्फे ठरवून दिलेल्या पाच ठिकाणी बाजार भरला होता. सोशल डिस्‍टन्स पाळण्यासंदर्भात लाऊडस्‍पीकरवरून वारंवार सूचना दिल्या जात होत्या.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. शहरात पाच दिवसांपूर्वी सोमवारी (ता. सहा) आठ ठिकाणी बाजार भरला होता. मात्र, बाजारात होत असलेली गर्दी पाहता जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिवसाआड भरणारा बाजार बंद करून पाच दिवसांवर भरविण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचाकोरोनाच्या लढाईत हिंगोलीत घडतेय माणुसकीचे दर्शन

विक्रेत्यांना बसण्यासाठी आखल्या रेषा

 त्‍याप्रमाणे शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात रामलीला मैदान, जिल्‍हा परिषद शाळा, मंगळवारी आठवडे बाजार, रेल्‍वे मैदान (आरोग्य शिबिरस्‍थळ) व खटकाळी बायपास येथे भरला होता. बाजाराच्या ठिकाणी रेखा आखून देण्यात आल्या होत्या. भाजी विक्रेत्याना सोशल डिस्‍टन्स पाळण्यासाठी अंतर देण्यात आल्याने बाजाराच्या ठिकाणी तुरळक प्रमाणात गर्दी झाली होती. 

सोमवारी भरणार बाजार

तसेच पाचही ठिकाणी पोलिस प्रशासनासह लाऊडस्‍पीकरद्वारे सोशल डिस्‍टन्स पाळण्या संदर्भांत वारंवार सूचना दिल्या जात होत्या. दरम्यान, आता पुढचा भरणारा बाजार जिल्‍ह्यात वसमतसह सर्व ठिकाणी सोमवारी (ता. १३) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात सुरू ठेवता येणार आहे. तसेच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे.

औंढा शहरात सोशल डिस्टन्स

औंढा नागनाथ : शहरात शुक्रवारी (ता. दहा) बाजार भरविण्यात आला होता. तसेच किराणा दुकानेही उघडण्यात आली होती. या वेळी सोशल डिस्टन्सचा वापर केला जात होता. या वेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, रामभाऊ मुळे, महादेव बळवंते, अविनाश चव्हाण, विजय महामुने, अनिल नागरे, उत्तम जाधव, हरिहर गवळी, मंजुषा राठोड, नलिनी मलमवार, नंदा अंभोरे, गंगाप्रसाद बुरकुले, सतीश रणखाबे, विष्णू रणखांबे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

येथे क्लिक करा सण, उत्‍सव घरीच साजरे करा : पोलिस अधीक्षक योगेशकुमार

वसमतमध्ये खरेदीसाठी गर्दी

वसमत : येथे शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा व भाजीपाला खरेदीसाठी वेळ देण्यात आला होता. या काळात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. शहरातील झेंडा चौक, मामा चौक, महावीर चौक आदी भागांंत खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. दुचाकी, तीन चाकी व चार चाकीला परवानगी नसल्याने आसेगाव कॉर्नर, गवळी मारोती मंदिर व शहरात जाणाऱ्या रस्त्यावर पथक नेमून पोलिसांनी वाहने अडवली. तसेच अनेक वाहनांवर जप्तीची कारवाई केली. शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील नागरिकांना पायपीट करावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable market is full after five days in Hingoli, Hingoli news