Video :  ‘देवा मला का दिली बायको अशी’, प्राचार्याने धरला ठेका

कैलास चव्हाण
Tuesday, 21 April 2020

लाॅकडाउनमुळे कोणी पत्नीला स्वयंपाकात मदत करतो, तर कुणी मुलांना खेळवत आहे. तर कुणी विविध कला सोशल मीडियावर सादर करत आहे. अशाच एका प्राचार्याने केलेल्या नृत्याच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

परभणी : लॉकडाउनच्या दरम्यान, सर्वच मंडळी घरात बसून आहे. अगदी मजूर ते मालक आणि कार्यकर्ता ते पुढारी यासह अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नोकरदार मंडळीदेखील घरीच बसून आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेकांच्या अंगी असणाऱ्या उपजत कला बाहेर पडू लागल्या आहेत.

लॉकाडाउनमुळे घराबाहेर पडणे शक्य नाही. अत्यावश्यक काम असेल तरच लोक घराबाहेर पडत आहेत. शाळा-महाविद्यालयांना मागील महिन्यातच सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून शिक्षक मंडळी घरीच बसून आहे. अन्य नोकरदार मंडळी, व्यापारी, राजकीय, उद्योजक, विक्रेते अर्थात सर्वच नागरिक आपापल्या घरात आहेत. त्यामुळे दिवसभर जेवण, मनोरंजन, झोप यापेक्षा काही करता येत नसल्याने अनेकांच्या अंगात असणाऱ्या कला सध्या बाहेर पडू लागल्या आहेत. कुणी महाविद्यालयीन जीवनात स्वयंपाक केलेला असतो. 

हेही वाचा - कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

विवाहानंतर स्वत:स्वयंपाक करण्याचा प्रसंग आलेला नसतो. परंतु, सध्या दररोज घरीच असल्याने स्वत:च्या हाताने पत्नीसह कुटुंबाला नवीन पदार्थ बनवून देण्यात पुरुष मंडळी आघाडीवर आहे. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर येत आहेत. कुणी गायनाचा छंद जोपासत आहे, तर कुणी वाचनात वेळ दडवत आहे. विविध कलाकारदेखील लोकांनी घरात थांबावे म्हणून विविध व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवत आहेत. अशा पद्धतीचा एक व्हिडिओ परभणीतून व्हायरल झाला आहे. त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याने त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

हे देखील वाचायलाच हवे -  ‘कोरोना’च्या लढाईत शिक्षकही उतरले...

‘देवा मला का दिली बायको अशी’ गाण्यावर धरला ठेका
परभणी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य तथा जिल्हा मराठी संघाचे अध्यक्ष सुरेश नाईकवाडे हे अभिजात कलावंत आहेत. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्या लॉकडाउनमुळे घरात काय करावे म्हणून त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत घरात विविध गीतांवर दररोज नृत्य सादर करणे सुरू केले. हे करत असताना एके दिवशी एका मराठी वाहिनीवर शिंदेशाही हा कार्यक्रम सुरू असताना गायक आनंद शिंदे यांनी दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले ‘देवा मला का दिली बायको अशी’ हे प्रसिद्ध गीत सादर केले. 

मुलाने घेतला व्हिडिओ 
हे गीत पाहून  श्री. नाईकवाडे यांना या गीतावर नृत्य करण्याचे सुचले अन् त्यांनी तत्काळ मूळ प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत डाऊनलोड करत नृत्य सुरू केले. हे करत असताना त्यांनी आपल्या पत्नीला समोर बसविले. त्यांची ही करामत त्यांचा लहान मुलगा यश याने कॅमेरात कैद केली. नृत्य पूर्ण झाल्यानंतर सहज म्हणून नाईकवाडे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसला तो व्हिडिओ ठेवताच प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या सुभाष बाकळे या मित्राने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लॉकडाउनमुळे अनेक गमतीजमती समोर येत आहेत. त्याचेच एक हे उदाहरण आहे.

 येथे क्लिक करा - परभणीतील उद्योग अडकले ‘कंटेंटमेंट झोन’मध्ये !

लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नका
घरात बसून कंटाळा येत आहे. वाचन, टीव्ही पाहून झाल्यानंतर मुलांसोबत गमतीजमती म्हणून नृत्य सादर करणे, गीत म्हणणे यात वेळ घालवत आहे. अनेकांनाही आपल्या कला सादर करण्याची संधी आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नका, घरातच राहा.
- सुरेश नाईकवाडे, प्राचार्य, परभणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 'that' video of the principal received a response,parbhani news