व्हिडिओ : पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

दोन दिवसांपासून जिल्‍ह्यातील वातावरणात बदल जाणवत असून मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसला. तर बुधवारीही अनेक ठिकाणीपावसाचे आगमन झाले. 

वारंगाफाटा (जि. हिंगोली) ः वारंगाफाटा(ता. कळमनुरी) परिसरात बुधवारी (ता.तीन) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी एकच्या सुमारास वीस मिनीटे जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला वेग आला आहे.

वांरगा, तोंडापूर, चुंचा, भोसी जामगव्हाण, शेवाळा आदी गावात दोन दिवसांपासून पाऊस होत असला तरी यावर्षीचा पहिल्यांदाच बुधवारी मोठा पाऊस झाला. यामुळे शेतकरी आता खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे व खताची खरेदी केली आहे. हिंगोली, सेगनाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा  : हिंगोलीत भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक -

पधंरा ते वीस मिनिटे पावसाच्या सरी

दोन दिवसांपासून जिल्‍ह्यातील वातावरणात बदल जाणवत असून मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तापमानाचा पारादेखील घटला होता. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास वसमत तालुक्‍यातील गिरगाव, परजना, खाजमापूरवाडी, बोरगाव खुर्द, मुरुंबा, माळवटा, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, आंबा, मरसूळवाडी तसेच हयातनगर व परिसरातील काही गावांत पधंरा ते वीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या.

रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप

औंढा नागनाथ तालुक्‍यातील जवळा बाजार, पुरजळ, गोजेगाव, साळणा, कळमनुरी तालुक्‍यातील उमरा, खानापूर चित्ता, तसेच हिंगोलीशहर व तालुक्‍यातील अंधारवाडी, बळसोंड, कारवाडी, पिंपळखुटा येथे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

 

मशागतीच्या कामांना वेग

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मागील पंधरा दिवस सूर्य तापत होता. त्यामुळे केवळ सकाळ, सायंकाळच्या वेळी शेतातील सुरू असलेली कामे आता दिवसभर केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणीची कामे केली असून आता काडीकचरा वेचणी केली जात आहे. 

विद्युत तारा तुटल्यास संपर्क करा

सेनगाव : सध्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्याची परिस्थिती पाहता विद्युत खांब पडणे व तार तुटून वीजप्रवाह खंडित होण्याच्या घटना घडू शकतात. या समस्येला तोंड देण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे. तार तुटणे व खांब पडल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

चार दिवसांवर पावसाळा

पावसाळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र सध्याची पावसाळी परिस्थिती व अवकाळी पाऊस तसेच जोराच्या वाऱ्यामुळे विद्युत पोल पडणे, तार तुटून वीज प्रवाह खंडित होण्याच्या संभाव्य घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

येथे क्लिक करा  : हिंगोलीत नऊ हजार मजुरांच्या हाताला काम -

महावितरण विभाग सर्व तयारीनिशी सज्ज

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महावितरण विभाग सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे.  कुठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी जनतेचा सहभाग असणे गरजेचे असल्यामुळे अशा घटना घडल्यास विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी तत्काळ नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिवितहानी टाळण्यास मोठी मदत

 विद्युत तारा तुटणे व खांब पडण्याची घटना घडल्यास त्याला स्पर्श न करता सदरील माहिती विद्युत विभागाला कळविल्यास संभावित जिवितहानी टाळण्यास मोठी मदत होईल, तसेच वीज ग्रांहाकाची गैरसोय होणार नाही, असे उपकार्यकारी अभियंता एस. बी. वडगावकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: Relief For Farmers With The Arrival Of Rains Hingoli News