eSakal Impact : सोनेरी महालात व्हिडिओ शूटिंगवर निर्बंध 

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सोनेरी महाल परिसराला कायमच टिकटॉक प्लेयर्सचा वेढा पडलेला असतो. हटकणाऱ्या सुरक्षारक्षकाला दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. यात पोलिसपुत्रही मागे नसतात. "मेरा बाप पुलिस है। क्‍या करना है कर ले।'' असं म्हणत अंगावर धावून जातात.

औरंगाबाद : बिबी का मकबऱ्यात झालेल्या आक्षेपार्ह फोटोशूटमुळे केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे वाभाडे निघत असतानाच, राज्य पुरातत्त्व खाते सजग झाले आहे. आपल्या अखत्यारीतील सोनेरी महाल परिसरात चित्रीकरण बंदीचा आदेश काढत त्यांनी टिकटॉक व्हिडिओ आणि मॉडेलिंग करत सोशल मीडियावर हवा करणाऱ्या टवाळखोरांवर निर्बंध घातले आहेत. 

या बातमीची घेतली दखल -

जगप्रसिद्ध बिबी का मकबरा परिसरात एका चित्रपटाचे विनापरवानगी शूटिंग सुरू असताना आक्षेपार्ह फोटोशूट करण्यात आल्याचे शुक्रवारी (ता.चार) उघडकीस आले. त्यानंतर चांगलाच गहजब उडाला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा कारभार यातून किती सुधारला याबद्दल शंका असली, तरी राज्य पुरातत्त्व खात्याने वेळीच कठोर पावले उचलली आहेत. विद्यापीठ परिसरात गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात असलेल्या सोनेरी महाल या राज्य संरक्षित स्मारक परिसरात टिकटॉक व्हिडिओ आणि हौशी चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी मकबऱ्याचा प्रकार उघडकीस येताच राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे सहायक संचालक अजित खंदारे यांनी हा आदेश काढला. 

मेरा बाप पुलिस है... 

सोनेरी महाल परिसराला कायमच टिकटॉक प्लेयर्सचा वेढा पडलेला असतो. हटकणाऱ्या सुरक्षारक्षकाला दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. यात पोलिसपुत्रही मागे नसतात. "मेरा बाप पुलिस है। क्‍या करना है कर ले।'' असं म्हणत अंगावर धावून जातात. मात्र, यातून काही चुकीचे प्रकार घडू नयेत, यासाठीच हा आदेश काढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष कारणास्तव व्हिडिओ शूटिंग करायचे असल्यास राज्य पुरातत्त्व संचालकांची परवानगी आवश्‍यक करण्यात आल्याचेही या आदेशात नमूद आहे.
 

या बातमीची घेतली दखल -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video shooting banned in Soneri Mahal