
मी उस्मानाबाद पोलिसात कार्यरत असून साहेबांनी वसुलीसाठी पाठविले असल्याची बतावणी करून एका तोतया पोलीस आणि बनावट पत्रकार असलेल्या ठकाने १० हजार रुपये रोख व दोन मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या भामट्याला गावकऱ्यानी चांगलाच चोप दिला.
कळंब (जि.उस्मानाबाद) : मी उस्मानाबाद पोलिसात कार्यरत असून साहेबांनी वसुलीसाठी पाठविले असल्याची बतावणी करून एका तोतया पोलीस आणि बनावट पत्रकार असलेल्या ठकाने १० हजार रुपये रोख व दोन मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या भामट्याला गावकऱ्यानी चांगलाच चोप दिला. ही घटना तालुक्यातील इटकुर येथे रविवारी (ता.२७) दुपारी घडली. या प्रकरणी कळंब पोलिसांनी या भामट्याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाशी तालुक्यातील मांडवा येथील विशाल अनिल काळे हा पोलिसांचा टी-शर्ट परिधान करून शनिवारी (ता.२६) इटकुर येथील नारायण गंभीरे या शेतकऱ्याच्या घरी आला.
त्याच्या कंबरेला बनावट पिस्तुल होती.घरी येऊन आपण उस्मानाबाद पोलिसात कार्यरत आहे आणि बातमीदार असून साहेबांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही अवैध धंदे करीत आहात. हे सर्व साहेबांना माहीत आहे. त्यामुळे तडजोड करा आता ५० हजार रुपये द्या,नाही तर कळंब पोलिसात तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली.घाबरलेल्या शेतकरी गंभीरे हे घरासमोर डोक्याला हात लावून बसल्याने त्याच्या खिश्यातील १० हजार रुपये घेऊन पळाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (ता.२७) हा भामट्या इटकुरला येऊन गंभीरे यांच्या घरी आला दारात बसलेल्या संतोष गंभीरे व नारायण गंभीरे यांना ४० हजार द्या नाहीतर पोलिस ठाण्यात चला तुम्हाला साहेबांनी बोलविले आहे असे सांगून या दोघांच्या खिश्यातील मोबाईल घेऊन पसार झाला. पळून जात असताना गावकऱ्यानी भामट्याला अडवून चोप दिला. यांच्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या नावाचे आयडी कार्ड, रिपोर्टरचे कार्ड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
भामट्यांनी अनेकांना गंडविले
पोलिसांसारखा टीशर्ट, दुचाकीला पोलिस सायरन बसून अनेक गावातील सर्वसाधारण नागरिकांना गंडविले असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी येथील पारधी वस्तीवरील काही नागरिकांना दमदाटी करून ६० हजार रुपयांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील अनेक नागरिकांना गंडविले आहे. दुचाकी विनानंबरची असून पोलिस पाटील सोमनाथ जगताप यांनी दुचाकी पोलीस ठाण्यात लावली आहे.
या मागचे सूत्रधार कोण
पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास या मागचे कोण सूत्रधार आहेत. किती जनाला या भामट्याने गंडवून लुटले हे उघडीकस येणार असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आयडी कार्ड यांच्याकडे कसे अनेकांना दम देऊन लुटले असल्याची शक्यता बळावत आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा
दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर