प्रशासनाने जिल्ह्याची अन् ग्रामस्थांनी केली गावची सीमा बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील ग्रामस्थांनी मंगळवार (ता. २४) गावात येणारे रस्ते अडवून गावात बाहेरून येण्यास व जाण्यास बंदी घातली. विशेष म्हणजे या ठिकाणी दंडुकाधारी ग्रामस्थही तैनात आहेत.

केज/धारूर (जि. बीड) - गर्दीमुळे आणि एकमेकांच्या संपर्कातून फैलावणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संचारबंदीत पोलिस प्रशासनाने जिल्ह्याच्या हद्दी सील केल्या आहेत. अत्यावश्यक कारणांसाठीच येण्या - जाण्याची मुभा आहे. अशीच काळजी काही ठिकाणी ग्रामस्थांनी घेतली आहे. संचारबंदीत गावात येणारे रस्ते रोखून गावात येण्यावर आणि गावातून जाण्यावर निर्बंध घातले आहेत. 

केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील ग्रामस्थांनी मंगळवार (ता. २४) गावात येणारे रस्ते अडवून गावात बाहेरून येण्यास व जाण्यास बंदी घातली. विशेष म्हणजे या ठिकाणी दंडुकाधारी ग्रामस्थही तैनात आहेत. शहरात काम-धंद्यासाठी गेलेले गावातील कुटूंबे भीतीने गावाकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र शहरात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणारे आले असतील? या भीतीने ग्रामस्थांनी स्वत:लाच निर्बंध घालून गावात येणारे रस्ते अडवले आहेत. त्यामुळे गावात येणे व गावातून बाहेर जाणे बंद करण्यात आले आहे. हा निर्णय जरी कटू वाटत असला तरी तो सर्वांना कोरोना सारख्या आपत्तीच्या संक्रमणापासून वाचवणारा आहे.

हेही वाचा - कोरोनात हे करा-शिळे अन्न खाऊ नका, फक्त ताजे अन शिजविलेले खा

सध्या गावात बरेच जण शहरातून आले आहेत. त्या लोकांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. मात्र त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याची आवश्यकता असल्याचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे म्हणाले. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

किल्लेधारुर तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतनेही गावाच्या चौफेर असणारे रस्ते मंगळवारी पूर्णपणे लॉक डाऊन करत गावातील व्यक्तीस बाहेर किंवा बाहेरील व्यक्तीस गावात येण्यास मज्जाव केला आहे. ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जगताप आणि ग्रामसेवक श्री. झोंबडे यांनी यासाठी पुढाकार घेत गावास जोडणाऱ्या मुख्य दोन रस्त्यावर दगड माती, काटेरी झुडपे टाकून लॉक डाऊन केले. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आणि वेळ ठरवून देऊन गावातील व्यक्तीस बाहेर किंवा बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश दिला जातो.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers close village boundary