‘या’ उरुसामुळे गावकरी जमतात एकत्र

पोतरा ः बोल्‍डा येथील मिश्कीन शहावली बाबांचा दर्गा.
पोतरा ः बोल्‍डा येथील मिश्कीन शहावली बाबांचा दर्गा.

हिंगोली ः बोल्‍डा (ता. कळमुनरी) येथील हिंदू - मुस्‍लिम एकतेचे प्रतिक असलेल्या मिश्कीन शहावली बाबांच्या उरुसानिमित्त दूरवरचे भाविक हजेरी लावतात. गावातील लेकी-जावयांना आमंत्रित केले जाते. कामानिमित्त बाहेरगावी असलेले गावकरीदेखील सुट्या घेऊन या कार्यक्रमात सहभागी होतात. संदल कार्यक्रमात सर्व ग्रामस्‍थांचा सहभाग असतो. गुरुवारपासून (ता.नऊ) उरुसाला सुरवात झाली आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डा हे गाव अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गावर आहे. गावची लोकसंख्या दीड हजाराच्या जवळपास आहे. गावात बहुतांश शेतकरी व शेतमजूर राहतात. बोल्‍डा रेल्‍वेस्‍थानकावर भरणारा आठवडे बाजार रेल्‍वे मार्गावर सर्वदूर परिचित आहे. येथे जिल्‍हाभरासह हैदराबाद, निजामाबाद, अकोला, वाशीम येथील व्यापारी धान्य व इतर साहित्य खरेदीसाठी येथे येतात. बाजारातील गूळ हा गावरान गूळ म्‍हणून प्रसिद्ध आहे. तो खरेदीसाठी हिंगोली शहरातील नागरिक येथे हजेरी लावतात. यामुळे हा बाजार सर्वदूर परिचित आहे. यासह रेल्‍वेस्‍थानकाच्या पूर्व भागातून राज्य मार्ग जातो. येथे बोल्‍डाफाटा नावाने हा चौरस्‍ता प्रसिद्ध आहे.

धान्य विक्रीसाठी येतात अनेक गावकरी
येथून आखाडा बाळापूर, हिंगोली, कळमनपुरी, औंढा नागनाथ, वसमत, नांदेडकडे जाणारा राज्य मार्ग आहेत. तसेच बोल्‍डाफाटा येथे बाळापूर बाजार समितीची उपबाजारपेठ असल्याने परिसरातील शंभरावरील गावांतील गावकरी येथे धान्य विक्रीसाठी घेऊन येतात. यामुळे बोल्‍डागाव, बोल्‍डाफाड्याची वेगळी ओळख आहे. तसेच बोल्‍डाफाटा येथील मुबारकभाई यांच्या हॉटेलमधील पेढा, चहा व खिचडीदेखील प्रसिद्ध असल्याने या मार्गावरून येणारे - जाणारे येथे थांबून पेढा, खिचडीचा स्‍वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

उंच माळरानावर मिश्कीन शहावली बाबांचा दर्गा
बोल्‍डा येथील एका उंच माळरानावर मिश्कीन शहावली बाबांचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या बाजूला देवीचे मंदिर आहे. येथे हिंदू व मुस्‍लिम भाविक एकत्रित येऊन विविध कार्यक्रम साजरे करण्याची पंरपरा आजही कायम आहे. ग्रामस्‍थ या माळरानावर असलेल्या वृक्षांची तोड करीत नाहीत. तसेच येथे होणारे सर्व कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करतात. या दर्ग्याच्या दर्शनासाठी दूरवरचे गावकरी उरुसानिमित गावात येतात. गावातील मुली व जावायांना निमंत्रण देऊन आवार्जून उरुसानिमित आणले जाते. कामानिमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्‍थ हमखास येतात. औरंगाबाद, नांदेड, नागपूर, अकोला, हैदराबाद आदी शहरांत राहणारे ग्रामस्‍थ उरुसासाठी येथे येतात.

‘मिश्कीनशहा बाबा’ यांच्या नावाने पुस्‍तक प्रकाशन
येथील कवी शफी बोल्‍डेकर यांनी ‘मिश्कीनशहा बाबा’ यांच्या नावाने पुस्‍तक प्रकाशन स्‍थापन केले असून ते स्‍वतः प्रसिद्ध कवी आहेत. त्‍यांनी अनेक पुस्‍तके, कथा, कादंबऱ्या, कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम
श्रावण महिन्यात येथे गोड भाताचे कार्यक्रम केले जातात. यात हिंदू व मुस्‍लिम दोघेही एकत्रितपणे हे कार्यक्रम साजरे करतात. उरुसानिमित निघणाऱ्या संदल कार्यक्रमातदेखील हिंदू व मुस्‍लिम बांधव एकत्रित सहभागी होऊन संदल कार्यक्रम साजरा करतात. हे अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. तसेच मंदिराच्या बाजूला असलेल्या भवानी मातेच्या मंदिरातदेखील विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यात हिंदू व मुस्‍लिम बांधव सहभागी होऊन हे कार्यक्रम साजरे करतात.

तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश
मंदिराचा शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश झाला असून त्‍यातून येथे मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या, विद्युतीकरणाची कामे करण्यात आली आहेत. आता येथे कायमस्‍वरुपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दर्गा परिसरात साठवण टाकी बांधून येथे पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे. तसेच दर्गा परिसरात एक सभागृहाचे बांधकाम करणे गरजेचे आहे.

बाहेरगावी असलेले गावकरी आवर्जून येतात
मिश्कीनशहा बाबांचा दर्गा व भवानी मातेचे मंदिर जवळजवळच आहेत. उरुसानिमित येथे होणारे सर्व कार्यक्रम एकत्रित साजरे केले जातात. संदलाचा कार्यक्रमदेखील एकत्रित साजरा केला जातो. उरुसानिमित बाहेरगावी असलेले गावकरी आवर्जून गावात येतात. हा दर्गा हिंदू-मुस्‍लिम एकतेचे प्रतिक आहे. -प्रल्‍हाद ढोकणे, सरपंच. 

विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
माळरानवर उंच टेकडीवर बाबाचा दर्गा व भवानी मातेचे मंदिर आहे. येथे होणारे सर्व कार्यक्रम एकत्रित साजरे केले जातात. श्रावणात येथे गोड भाताचा कार्यक्रम होतो. अनेक हिंदू व मुस्‍लिम भाविक एकत्रितपणे उत्सव साजरे करतात. अनेक वर्षांची चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे. गुरवारपासून येथे उर्साला सुरवात झाली असून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. -बाबामियॉ पठाण, पुजारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com