भाजपने मला द्यावे विरोधीपक्ष नेतेपद

दत्ता देशमुख
Monday, 9 December 2019

भाजपमध्ये सुरू असलेल्या ओबीसी खच्चीकरणाचा मुद्दा, पंकजा मुंडेंच्या पराभवाचे कारण यावर भाष्य करत सारथी संस्थेला स्थगिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही केली.

बीड : लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्रामनेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपण सर्वात सिनिअर असून अनुभवी आहोत. त्यामुळे भाजपने आपल्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी (ता. नऊ) बीडमध्ये केली.

वास्तविक हा निर्णय घेण्याचा अधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर आम्ही विरोधी पक्षात आहोत. आगामी काळात विरोधी पक्षाची कणखर भूमिका बजावणार आहोत. त्यासाठी शिवसंग्रामच्या आमदारांसह नेत्यांना घेऊन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे, महाडला डॉ. आंबेडकरांच्या चवदार तळ्याचे आणि जिजाऊंचे दर्शनाने संघर्षाची प्रेरणा घेऊन कामाला सुरुवात करणार आहोत, असेही श्री. मेटे म्हणाले.

का झाला जळगाव रस्त्याच्या कामावर खून?

त्यांनी यावेळी भाजपमध्ये सुरू असलेल्या ओबीसी खच्चीकरणाचा मुद्दा, पंकजा मुंडेंच्या पराभवाचे कारण यावर भाष्य करत सारथी संस्थेला स्थगिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही केली.

पराभव करायला कार्यकर्ते तर हवेत

दरम्यान, रोहिणी खडसे व पंकजा मुंडे यांचा पराभव भाजप नेत्यांनीच घडवून आणला या आक्षेपावर, त्या मतदारसंघात वा जिल्ह्यात इतर भाजप नेत्यांचे कार्यकर्ते तरी असायला हवे होते, असे विनायक मेटे म्हणाले. जिल्ह्यात भाजपने एकाही मतदारसंघात शिवसंग्रामला विश्वासात घेतले नाही, तरी आपण त्यांचे प्रामाणिक काम केल्याचे मेटे म्हणाले. भाजपमधील ओबीसी खच्चीकरणाबाबत इतर पक्षीय नेते बोलत असल्याचेही ते म्हणाले.

मराठा समाजाच्या हिताचे निर्णय रद्द

सारथीला स्थगिती देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा

मराठा समाजातील तरुणांसाठी बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्था सुरु केली होती. निवडणुकीच्या दरम्यान या संस्थेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Mete Asking For Opposition Leadership in LC