पपई बाग झाली 'घाटे का सौदा', विषाणूच्या हल्ल्यामुळे पाने गळाली

कमलेश जाब्रस
Sunday, 18 October 2020

मागील वर्षी धरण भरल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बागायती शेतीकडे वळला आहे. मोसंबी, सिताफळ यासह पपई लागवड तालुक्यात वाढली आहे.

माजलगाव (जि.बीड) : मागील वर्षी धरण भरल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बागायती शेतीकडे वळला आहे. मोसंबी, सिताफळ यासह पपई लागवड तालुक्यात वाढली आहे. परंतु या वर्षी पपईच्या पिकांवर विषाणूचा हल्ला झाला आणि त्यातही पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे पपई धोक्यात आली. परिणामी पपई बाग घाटे का सौदा झाली आहे. त्यामुळे पपई बागायतदार शेतकरी अडचणीत आला आहे.

भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता; शेतकरी म्हणाले, साहेब आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे

तालुक्यातील घळाटवाडी येथील शेतकरी दिनकर पठाडे यांनी जानेवारी महिन्यात ५ बाय ७ अंतरावर सोलापूर येथून तेरा रूपये प्रतिरोप असे एक हजार पपईचे रोप आणून ठिबकवर लागवड केली होती. लागवडीनंतर ठिबकसाठी त्यांनी बावीस हजार रूपये, फवारणी पंधरा हजार, खुरपणी चार हजार रूपये, रासायनिक खत नऊ हजार, शेण खत तीन हजार यासह त्यांना जवळपास एक लाख रूपयांचा खर्च केला होता.

बागेला वेळोवळी फवारण्या, खत, पाणी मिळत असल्याने बाग बहरात होती. त्यामुळे या शेतकऱ्यास चार ते पाच लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, परंतु पपईवर विषाणुच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडाचे पूर्णतः पाने गळुन पडली आणि फळांवर देखील याचा मोठा परिणाम झाला. परिणामी पपईची विक्री थंडावली. व्यापारी येऊन बघून गेले. परंतु खरेदीसाठी कुणीही धजावले नाही. त्यामुळे शेतकरी श्री.पठाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

साहेब, आमचं सगळच शेत वाहून गेल, तुळजापूरातील शेतकऱ्यांनी मांडली पवारांकडे व्यथा ! 

लहरी निसर्गाचा झळा
तालुक्यामध्ये मागील पाच वर्षांपासुन युवा शेतकरी डाळिंब, केळी, मोसंबी, चिकु, सिताफळ व पपई बागेकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने दुष्काळाच्या झळा या बागायतदार शेतकऱ्यांना बसत आहेत.

 

कापुस, सोयाबीन, तूर, मूग या पारंपारिक पिकांसोबत शेतात यावर्षी नव्याने पपईची लागवड केली होती. या शेतीतुन मोठे आर्थिक उत्पन्न अपेक्षित होते. परंतु परतीचा लांबलेला पाऊस आणि पपईवर विषाणूचा झालेला प्रादुर्भाव यामुळे पपई बाग घाटे का सौदा बनली आहे. विक्री अभावी केले खर्चही निघणे अवघड बनले आहे. झाडाला पपई लगडल्या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे झाडाला एकही पान राहिले नाही. पाने नसल्यामुळे पपईवर पडत असलेल्या उन्हामुळे आणि पावसाच्या थेंबामुळे फळाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील पपई खरेदीसाठी पाठ फिरविली आहे.

- दिनकर पठाडे, शेतकरी घळाटवाडी.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virus Attack On Papaya Crops Majalgaon Beed News