भाजपचे ‘हे’ खासदार बनणार मूकबधिरांचा आवाज

फोटो
फोटो

नांदेड : मूकबधिरांना स्वत: च्या समस्या मांडण्यासाठी वेदनामय जीवन कथन करण्यासाठी वाचा नसली तरी मूकबधिरांचा आवाज बनून मी स्वत: लोकसभा आणि विधानसभेतही त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी कटिबद्ध आहे. अशी ग्वाही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. 


महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, मूकबधीर (अपंग) कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात शनिवारी (ता. २९) पार पडला. यावेळी मेळाव्याचे उद्‌घाटक म्हणून खासदार चिखलीकर बोलत होते.

यांची होती प्रमुख उपस्थिती

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनु गायकवाड, सेवानिवृत्त तहसीलदार नागनाथ माळवदकर, माजी शिक्षण सभापती शिवराज होटाळकर, मारोती वाडेकर, मूकबधीर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिसमिल्ला शहा, प्रशांत पिंपळे, पत्रकार हरिहर धुतमल, नांदेड जिल्हाध्यक्ष विद्यासागर पिलगुडे, जयवंत हाटकर, अशोक पाटील मुगावकर यांच्यासह अश्विनी औलक, ए. बी. लोमटे, एस. डी. वैद्य, पी. पी. पेरगाड, एस. आर. गुंडे, यू. बी. आडे, एन. जी. सूर्यवंशी, जी. एन. पाईकराव, एम. के. डुकरे आदी उपस्थित होते.

मुकबधिरांचा मी स्वत: आवाज होणार

पुढे बोलताना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले, मूकबधीर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जीवनात असंख्य समस्या आहेत. त्यांना आवाज नसला तरी ते संवेदनशील असतात. व्यक्त होण्यासाठी त्यांच्याकडे वाचा नसल्याने त्यांना व्यथा मांडता येत नाहीत. देहबोलीवरचं त्यांचं जगणं, दु:खमय, यातनामय असे असते. त्यांची मनं हळवी असतात, म्हणूनच तर जात, धर्म याच्यापलीकडे जाऊन ही माणसं स्नेह, आपुलकी जपत असतात. त्यांच्यातील संबंध रक्ताच्या नात्यापलीकडचे असतात, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे जीवन सन्मानपूर्वक व्हावे, यासाठी शासन दरबारी आवाज नसलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मी स्वत: आवाज होणार. त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने लोकसभेत आवाज उठविणार, तर विधानसभेतही त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास खा. चिखलीकर यांनी दिला. 

मुकबधिरांचे नांदेड नगरीत स्वागत 

विशेष बाब ही की जयवंत हटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मला या मेळाव्यास निमंत्रित केले, त्यामुळे मला मूकबधिरांच्या समस्या, व्यथा, वेदना समजून घेता आल्या. ही संधी मला त्यांनी मिळवून दिली, त्यामुळे मी संयोजकांचे आभार मानून मेळाव्यासाठी आलेल्या सर्व मूकबधीर कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नांदेड नगरीत स्वागत करतो. आपल्या दु:ख आणि वेदनांचा आवाज मला कधीही द्या, मी आपल्या मदतीसाठी तत्पर असेल, अशी भावनिक सादही खा. चिखलीकर यांनी घातली.

बहुतांश लोकांनी अनुपस्थिती लावल्याने नाराजी 

मूकबधिरांच्या मेळाव्यात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उद्‌घाटकीय भाषणाचे मूकबधिरांच्या देहबोलीतून भाषांतर तस्लीमा शेख यांनी केले. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी मेळाव्यासाठी अनेक राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता, मात्र निमंत्रण पत्रिकेवरील बहुतांश लोकांनी अनुपस्थिती लावल्याने नाराजी व्यक्त केली. मुक्या वेदना समजून घेण्यासाठी संवेदनशील मनाचीच माणसे लागतात. ती माणसे खा.चिखलीकर यांच्यासारखी असतात, असा उल्लेखही गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिसमिल्ला शहा यांनी केले.

या आहेत मागण्या

यावेळी नोकरीतील मूकबधिरांचा कोटा त्वरित भरावा, हा कोटा 3 टक्क्याहून 6 टक्क्यावर न्यावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, पदोन्नती त्वरित मिळावी, वाहतूक भत्ता दोन हजार रूपये करावा, विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी, आदी मागण्यांचा ठरावही पारीत करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय कौलासकर, राम परणकर, शिलानंद हटकर, विद्यासागर फिलगुंडे, एच.बी. लोमटे, एस.बी. वैद्य, पी.पी. शेगाड, एस.एस. गुंडे आदींनी परिश्रम घेतले. नांदेड, पुणे, मुंबई, सोलापूरसह  राज्यातील सर्व जिल्ह्यातील मूकबधीर कर्मचारी सहकुटुंब या अधिवेशनास उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com