Accident News : रक्तात नाहली भाकरी...!

ऊसतोडीला जाताना बैलगाडीला बसने उडविले : आई-मुलगा ठार, वडिलांसह दुसरा मुलगा गंभीर
Accident News
Accident News

शेंदूरवादा/वाळूज : जगात सगळ्या गोष्टीचे सोंग आणता येते. पण, भुकेचे नाही. भाकरीसाठीचा संघर्ष स्थलांतर करायला भाग पाडतो. कधीकधी या संघर्षाचा शेवटही मनाला वेदना देणारा होतो. जिच्यासाठी जिवाचे रान केले ती भाकरीच रक्तात न्हाऊन जाते. कोणत्याही सुज्ञ माणसाचे मन सुन्न व्हावे, असाच एक अपघात शेंदूरवादा परिसरात घडला. ऊसतोडीला जाताना बसने बैलगाडीला उडविले, यात ऊसतोड मजूर आईसह मुलगा ठार झाला तर पतीसह दुसरा मुलगाही गंभीर जखमी झाले.

गोविंद विठ्ठल गिरे हे (रा. गणेशनगर, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक) आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी ढोरेगाव (ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) येथे ऊसतोड कामगार म्हणून आले होते. घरातील अडीअडचणीला मुकादमाकडून पैसे उचल घेतल्याने उचल फेडून दोन पैसे कमवण्यासाठी पहाटे चारपासून रात्री दहापर्यंत काम करणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे होता. मेहनतीचे काम करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता.

ज्या भाकरीसाठी गिरे कुटुंब आले होते, त्या घेऊन गोविंद विठ्ठल गिरे हे बैलगाडीने पत्नी कलाबाई, मुलगा अर्जुन, मोठा मुलगा बाळू हे ऊसतोडीसाठी रोजच्याप्रमाणे मंगळवारी (ता.२९) पहाटे ढोरेगाव शिवारातील उसाच्या शेताकडे निघाले होते. त्यांची बैलगाडी इंडियन हॉटेलजवळ येताच सुसाट वेगाने जाणारी बस (एमएच १४, बीटी २५००) काळाच्या रूपात आली नि त्यांची सोबत आणलेली भाकरीसुद्धा रक्तात नाहली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. बसच्या भीषण धडकेत कलाबाई गोविंद गिरे, मुलगा अर्जुन गोविंद गिरे ठार झाले तर पती गोविंद गिरे, मोठा मुलगा बाळू हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची मालिका सुरूच

शेंदूरवादा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सात अपघात झाले असून यामध्ये पाच ठार तर आठ जखमी झाल्याची घटना घडल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे. हा महामार्ग नसून मृत्यू मार्ग झाला की काय, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडत आहे. या महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याने या महामार्गाने प्रवास करावा का नाही, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे.

अधिकाऱ्यांची धावाधाव

एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, यंत्र अभियंता श्रावण सोनवणे, सहायक कार्यशाळा अधीक्षक आर.के.सोनवणे, वाहतूक निरीक्षक गो.जो.पगारे, औरंगाबादचे वाहतूक निरीक्षक रियाज खान, एस.पी.बागूल, प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक चौरे, पोलिस उपनिरीक्षक अजहर शेख, दीपक औटे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावाधाव करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

बस आली अन् घात झाला

भाकरीचे गाठोडे जवळ असताना काळाने या कुटुंबावर घाला घातला. अपघाताच्या ठिकाणचे दृश्य पाहतच कवी प्रवीण हटकर यांच्या ओळींची प्रचीती आली. ते म्हणतात, ‘‘भाकर करंटी रक्तात नाहली; वांझोटी राहिली भोगाविना।’’ हा अपघात नव्हे तर परिस्थितीने घेतलेले बळीच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दोन पैसे कमवून गावी जाण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com