घंटा वाजली; प्या पाणी! 

संदीप लांडगे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

  • - आडगाव बुद्रूक येथील भगवानबाबा विद्यालयात वॉटर बेल उपक्रम 
  • - जगण्यासाठी पाणी आवश्‍यकच 
  • - शाळेत लहान मुले अभ्यास करताना किंवा खेळाच्या तासानंतर पाणी पिण्याचे टाळतात.
  • - पाणी कमी झाल्यास होतात हे आजार 

 

औरंगाबाद-  मानवी आरोग्यासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे; पण पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार जडतात. लहान मुले तर दिवस-दिवसभर पाणी पिण्याचे टाळतात. हेच हेरून जिल्ह्यातील आडगाव बु. येथील भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारपासून (ता. 20) "वॉटर बेल' उपक्रमाला सुरवात झाली आहे. 

या उपक्रमाच्या उद्‌घाटनाला विनायक वाघ, बी. एस. वाघ, मच्छिंद्र पाटील घोरपडे आणि श्रीकांत हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. केरळमधील शाळांच्या धरतीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित पाणी प्यावे या दृष्टीकोणातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी दिवसांतून भोजन वेळेच्या अगोदर आणि नंतर शिवाय मधल्या सुटीत मुलांना घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण दिली जाते. घंटा वाजताच मुले एकाच वेळी दप्तरातून पाण्याची बॉटल काढून पाणी पितात. हा उपक्रम राजीव वाघ यांनी शाळेत सुरू केला. या उपक्रमाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. बी. डी. बडधे यांनी सूत्रसंचालन केले. आर. ए. पगारे यांनी आभार मानले. 

जगण्यासाठी पाणी आवश्‍यकच 
अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो; पण पाण्याचा एकही थेंब न घेता पाच दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण एक टक्का कमी झाले तर आपल्याला तहान लागते. हे प्रमाण पाच टक्‍क्‍यांनी कमी झाले तर स्नायूंची शक्ती तसेच जोम कमी होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण दहा टक्के कमी झाल्यानंतर माणसाला भ्रम व्हायला सुरवात होते. दृष्टी अंधुक होते. वीस टक्के पाण्याचे प्रमाण कमी झाले तर मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे अतिशय आवश्‍यक आहे. 

हेही वाचा ः  आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्तीसाठी धडपडणारी जि.प. शाळा : video​

पाणी कमी झाल्यास होतात हे आजार 
जर पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले तर शरीरातील टाकाऊ पदार्थ साचून त्वचा कोरडी होणे, अपचन, बद्धकोष्ठता, डोकेदुखी असे त्रास सहन करावे लागतात. नाजूक अवयवांचे रक्षण डोळे, तोंड, पचनसंस्था, सांधे इत्यादी अवयवांना पाण्याचा पुरेसा पुरवठा आवश्‍यक असतो; पण याकडे आपले कधीच पुरेसे लक्ष नसते. पाण्याच्या अभावामुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो. 
 

शाळेत लहान मुले अभ्यास करताना किंवा खेळाच्या तासानंतर पाणी पिण्याचे टाळतात. पाणी न पिण्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अनेक शारीरिक आजार होतात. केरळच्या शाळांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आल्याचे वाचल्यावर आपणही हा उपक्रम राबवावा, असे आमच्या शाळेतील शिक्षकांच्या मनात आले. त्यामुळे आम्हीही ही संकल्पना शाळेत सुरू केली आहे. 
- बी. एस. वाघ, मुख्याध्यापक, भगवानबाबा विद्यालय. 

 

हेही वाचा -  हरवलेल्या दुचाकीसाठी तो स्वत:च बनला पोलिस! : Video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Bell activities at BhagwanBaba School