लातूरसाठी तयार होतेय "वॉटर फूटप्रिंट'

हरी तुगावकर
शनिवार, 7 डिसेंबर 2019

  • सर्वेक्षणाद्वारे करणार सूक्ष्म अभ्यास
  •  राज्यातील पहिलाच प्रयोग 
  • कौस्तुभ दिवेगावकर यांचा पुढाकार
  • भूस्तर रचनेसह विविध पैलुंचे होणार मुल्यांकन

 

लातूर ः सततची पाणीटंचाई, रेल्वेने आणावे लागलेले पाणी, कधीकधी पाणी असूनही नियोजनाचा अभाव आदी प्रकारांत दरवर्षी लातूर शहर राज्यात चर्चेत रहात आहे. लातूरमध्ये खरेच पाणी कमी आहे का, नियोजनाचा अभाव आहे का, लोकांची मानसिकता काय आहे, पाण्याचा वापर कसा होतोय, भूपृष्ठाखालील पाण्याच'ा किती वापर होतोय आदींचा अभ्यास "लातूर वॉटर फूटप्रिंट' या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. त्यासाठी लातूरचे सुपुत्र, राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

लातूरची टंचाई देशभर गाजल्याने हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. लातूरची भूस्तर रचना, भूजल विकास, भूजल संवर्धन, त्याची गुणवत्ता असे विस्तृत मूल्यांकन केले जाणार आहे.

होणार मुल्यांकन

या अभ्यासातून लातूरमध्ये भूजल, भूपृष्ठीय पाण्याचा वापर किती, जलफेरभरणाचे प्रमाण किती, कोणत्या भागात जलफेरभरण करण्याची गरज आहे, विविध प्रकारच्या विसर्गामुळे भूजल दूषित होत आहे का, उपसा स्रोत किती अशी विस्तृती माहिती गोळा करून अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासात घरगुती, सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, औद्योगिक क्षेत्रात किती पाण्याचा वापर होतो, याचीही माहिती समोर येणार आहे. 
व्हिडीयो पाहून पोहोचले अपघातग्रस्तांच्या मदतीला
प्रभागनिहाय माहिती घेणार 
अंघोळ, दाढी, दात घासणे, भांडी, कपडे धुणे यासोबतच पिण्यासाठी किती पाणी लागते, आरओचा वापर होतो का, बादलीऐवजी शॉवर, फ्लश वापर होतो का, गाडी धुण्यासाठी किती पाणी वापर, कूपनलिका आहे का, त्यातून दररोज किती तास उपसा, नळाला किती तास पाणी येते, वॉटर मीटर बसविले तरी किती बचत होईल आदी अनेक प्रश्नांची उत्तरे सर्वेक्षणातून मिळविली जाणार आहेत. प्रभागनिहाय ही माहिती गोळा केली जात असून त्याचे नकाशेही तयार करून लातूरच्या पाण्याची नेमकी स्थिती जाणण्याचा प्रयत्न होणार आहे. 
कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही- बच्चू कडू
यांच्यावर जबाबदारी 
या प्रकल्पासाठी दिवेगावकर यांनी पुढाकार घेतला असून अभ्यासाचे टीम लीडर म्हणून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या कामाकरिता विद्यापीठ उपकेंद्रातील डॉ. अनिलकुमार जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसडब्ल्यू, बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी सर्वेक्षणासाठी घेण्यात आले आहेत. 

गावाच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास केला जातो तसा शहराचा होत नाही. त्यामुळेच टंचाईने चर्चेत आलेल्या लातूरची सर्वेक्षणासाठी निवड केली आहे. राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे. शहरातील तीन हजार घरे, हॉटेल, रुग्णालये, शिक्षणसंस्था, सोयायट्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढला जाणार आहे. खरेच लातूर टंचाईग्रस्त आहे का, काय उपाययोजना केल्या जाव्यात हे या अभ्यासातून सांगता येणार आहे. भूजल कायदा 2014 तयार झाला आहे. त्याचे नियम अंतिम टप्प्यात आहेत. यात काय अडचणी येऊ शकतात, हे या अभ्यासातून कळण्यास मदत होणार आहे. 
- कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water foot print for Latur