आमच्यामागं हमेशा दुष्टचक्राचा फेराच...

नीळकंठ कांबळे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मोघा (खुर्द) येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा 

लोहारा (जि. उस्मानाबाद) : मागच्या चार-पाच वरसापासनं निसर्ग हात धुवून मागं लागलाय... कधी दुष्काळ तर कधी पावसाचा अतिरेक होतुया... औंदा तर पावसानं खरीप अन्‌ रब्बीचाबी हंगाम हातचा घालीवलाय... सगळा शिवार नासून गेलाय... दिवसागणिक कर्जाचा डोंगर वाढत चाललाय... दोन पोरी उपवर होऊन घरात बसल्याती, त्यांचं हात पिवळं करावं म्हणतोय; पण खिशात दमडी नाही... आमचं नशीब कसं लिव्हलंय सटवीनं काय माहीत... आमच्यामागं हमेशा दुष्टचक्राचा फेराच असतोया... जगणं लय अवघड झालंय... अशा शब्दांत तालुक्‍यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी तुकाराम भोंडवे यांनी आपली व्यथा मांडली.

लोहारा तालुका कृष्णा व गोदावरी खोऱ्यांच्या सीमेवर वसला आहे. पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब वाहून जातो. येथे सिंचनाची फारशी सोय नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. मोठे उद्योग-धंदे नसल्याने शेती व्यवसायावरच उपजीविका भागवावी लागते. परंतु पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने मागील पाच-सहा वर्षांपासून तालुक्‍याला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे बळिराजाला नेहमीच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यंदा दीड महिन्यानंतर उशिरा पाऊस झाला असतानाही मागच्या वर्षाचे कर्जाचे ओझे चालू वर्षात फेडून चार पैसे शिल्लक ठेवता येतील, या अपेक्षेने तालुक्‍यातील बळिराजाने कधी नव्हे ती पहिल्यांदा मोठ्या जिद्दीने 102 टक्के खरिपाची पेरणी केली. तुरळक पावसावर पिके जोमदार आली. त्यामुळे उत्पादनाची मोठी आशा असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार माजवला.

अतिवृष्टी व त्यानंतर सलग एक महिना पाऊस झाल्यामुळे हातातोंडाला आलेल्या खरीप पिकांची मोठी नासाडी झाली. कांदा, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब बागांना याचा मोठा फटका बसला आहे. तालुक्‍यातील जवळपास 80 टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने बळिराजाचे पार कंबरडेच मोडले आहे. 

चंद्रकांत दादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे

तालुक्‍यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी तुकाराम भोंडवे (वय 70) यांना सहा मुली आहेत. चार मुलींचे लग्न झाले आहे. दोन मुली उपवर झाल्या आहेत. त्यातील एक दिव्यांग आहे. घरात कर्ता पुरुष एकटाच असल्याने आपल्या पाच एकर शेतात मेहनत घेऊन घरप्रपंच चालवतात. यंदा तीन एकरांमध्ये सोयाबीन तर एका एकरमध्ये उडीद, कांदा व उसाची लागवड केली आहे. आतापर्यंत शेतात एकूण 60 हजार रुपये खर्च केले. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन व कांद्याचे मोठे नुकसान झाले तर ऊस आडवा पडला आहे. मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. सोयाबीन व कांदा शेतात तसाच आहे. काढणीसाठी पैसे नसल्याने पीक पूर्णत: नासून गेले आहे. शेतात पाणी असल्यामुळे वाफसा वेळेत होणार नसल्याने रब्बी पेरणीची आशाही मावळली आहे. 

मागच्या वर्षी हातउसनं अन्‌ कर्ज घेऊन एका पोरीचं लग्न करून दिलं होतं. लग्नासाठी घेतलेलं कर्ज यंदाच्या हंगामात फेडून शिल्लक राहिलेल्या पैशांतून दुसऱ्या पोरीचं लग्न उरकून टाकावं, असा बेत होता. पर पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलं. एक पोरगी तालुक्‍याच्या कालेजात चौदावीचं शिक्षण घेतीय. लय हुशार हाय पण तिच्या कालेजाचा खर्च अन्‌ संसार कसा चालवायचा कायबी कळंना झालंय. 
- तुकाराम भोंडवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We always have a vicious cycle ...