शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार : सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार व्हेंटीलेटरवरील सरकार असून, ते किती दिवस टिकेल आणि राज्याचा काय विकास करेल हे कुणालाही सांगता येणार नाही.

नांदेड :  ‘‘कोणीही भाजपाच्या सोबत येऊ शकतो. ‘सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नाही कहते’ असे सांगत शिवसेनेसोबत आमची नैसर्गिक मैत्री आहे.  त्यामुळे शिवसेनेने जर प्रस्ताव दिला तर आजही आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी तयार आहोत, असे खळबळजनक विधान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

सिडको नांदेड येथील महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या प्रांगणात आर्य वैश्य समाजाचे आराध्य दैवत वासवी कन्यका परमेश्वरी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी (ता.29 जानेवारी 2020) झाला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सापत्निक उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी काही मोजक्याच प्रतिनिधींसोबत संवाद साधला.   

हेही वाचा - नांदेडच्या वजिराबाद पोलिसांनी धरला ‘हा’ चोर

हे एकविसाव्या शतकाती आश्‍चर्यच आहे
राज्यात महाविकास आघाडीच्या रुपाने भिन्न विचाराचे सरकार स्थापन झाले असून हे एकविसाव्या शतकातील आश्चर्य आहे.  भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांसाठी, सामान्य जनतेसाठी काहीही करण्याची इच्छा नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले सरकार कधी कोसळेल हे सांगता येणार नाही. 

 

वासवी कन्यका परमेश्वरी मातेची शोभायात्रा
महासभा सहकोषाध्यक्ष डॉ. नरेश रायेवार, वासवी क्लब सिडको अध्यक्ष तुकाराम पातेवार यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (ता. २९) हडको येथील बालाजी मंदिरातून वासवी कन्यका परमेश्वरी मातेची शोभायात्रा वासवी भवनपर्यंत निघाली. त्यावेळेस सिडको-हडको आणि परिसरातील आर्य वैश्य समाज संघटना, वासवी क्लब इंटरनॅशनल सिडको, हडको, वासवी क्लब, वनिता क्लब, आर्य वैश्य महासभा नांदेडचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विविध समित्यांचे प्रमुख आणि अन्य समाजातील भक्तभाविक सहभागी होऊन शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करीत होते.

अनेक मान्यवरांची उपस्थिती
ता. २७ ते ता. २९ जानेवारी दरम्यान झालेल्या विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमास गुरूवर्य भास्कराचार्य महाराज, एकनाथ महाराज कंधारकर, महेश महाराज शेवाळकर, महेश महाराज जिंतूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तीस यजमानांच्या सहभागाने तीन दिवस विविध पूजा-अर्चा, यज्ञ करण्यात आले. कलशारोहण महेश महाराज जिंतूरकर यांच्या हस्ते झाले. पहिली महाआरती आमदार मुनगंटीवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांच्यासह महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंद बिडवई, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, बांधकाम समिती अध्यक्ष भानुदास वट्टमवार, व्यवस्थापन समिती प्रमुख अनिल मनाठकर, महासभा उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मूर्तीदाता प्रमोद कवटकवार आदींच्या सहभागाने करण्यात आली.

हेही वाचा - मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

मान्यवरांच्या हस्ते सत्कार
मंदिर निर्माणात आणि सर्व उपक्रमातील देणगीदारांचा सत्कार आमदार मुनगंटीवार, सपना मुनगंटीार तसेच उपस्थित गुरूवर्यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक दानशूर बांधव आणि समाजबांधवांच्या सहकार्याच्या योगदानातून हे यश मिळाल्याचे महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंद बिडवई, बांधकाम समिती अध्यक्ष भानुदास वट्टमवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले. प्रा. विजय बंडेवार यांनी सुत्रसंचालन केले, तर बिपिन गादेवार यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will set up a government if the Shiv Sena proposes: Sudhir Mungantiwar, Nanded News