स्त्रीजन्माचे बीडमध्ये अनोखे स्वागत; एकाच मांडवात 836 मुलींचे नामकरण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

बीड जिल्ह्यात स्त्रीजन्माचे अनोखे स्वागत झाले झाहे. एकाच मांडवात एकाच वेळी 836 मुलींचे बारसे आणि नामकरण करण्याच्या सुखद बाबीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. 

बीड - स्त्रीभ्रूणहत्या, मुले-मुलींचे विषम प्रमाण, कारखान्यावर ऊसतोडणीचे काम बुडू नये म्हणून गरज नसताना भीती दाखवून महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार अशा अनेक बाबींमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात स्त्रीजन्माचे अनोखे स्वागतदेखील झाले झाहे. एकाच मांडवात एकाच वेळी 836 मुलींचे बारसे आणि नामकरण करण्याच्या सुखद बाबीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.

खटोड प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवात आरोग्य विभागाच्या पुढाकाराने रविवारी (ता. पाच) हा उपक्रम पार पडला. खऱ्या अर्थाने बेटी बचाओ, बेटी पढाओची प्रचिती यानिमित्ताने आली. भव्य सभामंडप... एकाच वेळी तब्बल 836 पाळण्यांत बसवलेल्या चिमुकल्या... व्यासपीठावरून गायिली जाणारी बारशाची गीते... अन्‌ गर्दीने फुलून गेलेल्या सभामंडपात नातेवाइकांना वाटली जाणारी मिठाई... असे सुखद दृश्‍य बीडकरांना अनुभवता आले. डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेल्या तब्बल 836 मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

खासदार डॉ. प्रीतम मुंडे, "वंडर बुक रेकॉर्ड'च्या भारतातील हैदराबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. प्रतिभा थोरात, आसाराम खटोड, संपत मुनोत, पारस बोरा, योगेश बोरा, कमलबाई संचेती, राजेंद्र मस्के, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सुशील खटोड, भरतबुवा रामदासी महाराज उपस्थित होते.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

नामकरण सोहळ्यास मुलींचे कुटुंबीय आणि नातेवाईकही आवर्जून उपस्थित होते. नामकरण सोहळ्याप्रसंगी औरंगाबाद येथील अनघा संदीप काळे व गौरव पवार यांचा संगीतमय बारशाचा कार्यक्रम झाला. त्यांनी "मेरे घर आयी एक नन्ही परी', "मोगरा फुलला', "छोटी सी नन्ही सी प्यारी सी आयी परी' आणि बारशाची गीते सादर केली. 
या सामूहिक नामकरण सोहळ्याची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या लंडनस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेसह गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने नोंद घेतली. वंडर बुक रेकॉर्डच्या भारतातील हैदराबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुराम यांनी या नामकरण सोहळ्याचे निरीक्षण केले. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम
 

मातांसह कन्यारत्नांचा सन्मान 
खटोड प्रतिष्ठानच्या वतीने मुलींच्या सामूहिक नामकरण सोहळ्यात मुलीच्या आईचे फेटा बांधून स्वागत करतानाच साडी-चोळीची भेट देऊन हळदी-कुंकू करत स्वागत सत्कार करण्यात आले. मुलींना पाळणा, ड्रेस, ड्राय फ्रुट, घुगऱ्या, खेळणी, टेडी भेट स्वरूपात देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome to the Bid of Women