महाराष्ट्रासाठी अशोक चव्हाण यांनी गडकरींकडे काय मागितले....वाचा...

अभय कुळकजाईकर
Tuesday, 28 April 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे देशातील मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी श्री. गडकरी यांच्याकडे महत्वाच्या मागण्या मांडल्या.

नांदेड - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. २८) देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी नांदेडहून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महाराष्ट्रातील महामार्गाच्या कामांची स्थिती आणि परिस्थितीची माहिती दिली तसेच महत्वाच्या मागण्यांही मांडल्या.  

महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या चर्चेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते निर्मितीतील विविध अडचणी आणि येणाऱ्या समस्या या विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना माहिती दिली.

हेही वाचा - पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडला ठाण मांडून...

राज्यात संथगतीने कामे सुरु
राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलदगतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने द्यावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

विभागीय आयुक्त स्तरावर समिती हवी
राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत. परंतु अनेक कंत्राटदार वेळेवर कामे करत नाहीत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. जे कंत्राटदार वेळेत काम करीत नाहीत, अशांची कामे रद्द करावीत व त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने होण्यासाठी व येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समितीचे गठण करण्यात यावे व त्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचलेच पाहिजे - Video : नांदेड महापालिकेचे आयुक्त काय म्हणाले वाचा...

या महामार्गांना मागितली मान्यता
महाराष्ट्रातील अंकलेश्वर - चोपडा - ब्राहणपुर - देवराई - शेवगांव - नेवासा - संगमनेर, कोल्हापूर - महाबळेश्वर - शिरूर, सागरी मार्ग - खोल - अलिबाग - रत्नागिरी - वेंर्गुला - रेड्डी - गोवा या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी श्री. गडकरी यांच्याकडे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did Ashok Chavan ask Gadkari for Maharashtra .... Read ..., Nanded news